सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कोणीतरी नेता सुनेत्रा काकींच्या खांद्यावर हात टाकतो, कोणीतरी ओढतो; रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील 'चौकडी'वर हल्लाबोल
  • भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
  • तुम्ही नवे पर्व सुरु झालं म्हणता, पण अजितपर्व कधीच संपणार नाही, रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल
  • दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्ली कोर्टातून निर्दोष मुक्तता, केजरीवाल हमसून रडले, म्हणाले, 'आम्ही नेहमी सांगायचो ...'
 शहर

अनंतराव पवार महाविद्यालयात 'मराठी भाषा गौरव दिन' सोहळा; 'जाऊ कवितेच्या गावा' उपक्रमातून भाषेचा जागर!

डिजिटल पुणे    28-02-2026 18:23:23

पुणे (पिरंगुट): पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात 'मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी विभागाच्या वतीने 'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'जाऊ कवितेच्या गावा' या विशेष कार्यक्रमाचे अतिशय उत्साहात आणि वैचारिक वातावरणात आयोजन करण्यात आले होते. केवळ एक उपक्रम म्हणून नव्हे, तर मराठी भाषेचा अभिमान आणि तिचे जतन करण्याचा 'संस्कार' विद्यार्थ्यांमध्ये रुजावा, या उद्देशाने हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात अभिनव अशा भित्तीपतक आणि मराठी स्वाक्षरी मोहिमेने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो आणि प्रमुख पाहुणे प्रा. भास्कर घोडके यांच्या हस्ते या मोहिमेचे व भित्तीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी मराठीत स्वाक्षरी करून भाषेप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. त्यानंतर ज्ञानपीठ विजेते कवी कुसुमाग्रज आणि थोर शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमा पूजनाने मुख्य सोहळ्याला प्रारंभ झाला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांनी प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. भास्कर घोडके यांचा पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विजय बालघरे यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास सांगत, मराठी भाषा संवर्धनाचे महत्त्व आणि कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.तसेच आपण आपल्या मायबोली मराठी भाषेत बोलताना कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगू नये. आपली भाषा समृद्ध आहे, सशक्त आहे ती तेवढ्याच प्रभावीपणे सर्व ठिकाणी आत्मविश्वासाने प्रत्येकाने वापरावी असेही आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाची खरी रंगत विद्यार्थ्यांच्या मनोगतांनी वाढली. विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या (स्वरचित) कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.  विद्यार्थ्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कविता आणि भाषणांतून मराठी भाषेची महती आणि तिचे महत्त्व अधोरेखित केले.आपल्या स्वरचित कविता सादर करून केशवसुत स्मृती करंडक मिळवणाऱ्या महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनी सोनाली सरोदे आणि सानिका म्हेत्रे यांचाही सत्कार करण्यात आला व त्यांना पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे निमंत्रित कवी प्रा.भास्कर घोडके यांचे सादरीकरण. सरांनी आपल्या 'जाऊ कवितेच्या गावा' या विशेष उपक्रमातून विद्यार्थ्यांना कवितेच्या विश्वात नेले.  त्यांच्या कविता काळजाला भिडणाऱ्या तर कधी हसवणाऱ्या तर कधी डोळ्यात पाणी आणणाऱ्या होत्या. त्यांच्या कवितांनी संपूर्ण सभागृहाला मंत्रमुग्ध केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, "विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मातृभाषेचा वाटा मोठा असतो. महाविद्यालयात राबवले जाणारे असे उपक्रम विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवतात." सरांनी प्रत्येक पावलावर विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शनाचा उल्लेख यावेळी करण्यात आला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आणि प्रभावी सूत्रसंचालन रोहिणी गोरे आणि निशांत बिरादार या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी मराठी विभाग प्रमुख डॉ. विजय बालघरे, डॉ. गणेश चौधरी आणि डॉ. सिद्धार्थ नवतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पूजा पाईकराव या विद्यार्थिनीने केले, तर दिव्या कोकाटे या विद्यार्थिनीने सादर केलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या 'पसायदानाने' या मंगलमय कार्यक्रमाची यशस्वीरित्या सांगता झाली.

या कार्यक्रमासाठी श्री.विशाल मोकाटे,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, यांनी विशेष सहकार्य केले. छायाचित्रण महाविद्यालयाचा विद्यार्थी संकेत ओव्हाळ,नारायण चुंचलवाड यांनी केले. तर सदर कार्यक्रमाचा व्हिडिओग्राफी गजानन शेळके या विद्यार्थ्यांने केली.

अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे महाविद्यालयात मराठी भाषेच्या संवर्धनाचा नवा विचार रुजला असून, विद्यार्थ्यांनी आपली भाषा जपण्याचा संकल्प केला आहे.


 Give Feedback



 जाहिराती