मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभागृहात महायुतीकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून निवासी घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा वाढवण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी 500 चौरस फूटपर्यंतच्या घरांना मिळणारी करमाफी आता 700 चौरस फुटांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव पुढे सरकवण्यात आला आहे.
या निर्णयामुळे शहरातील मध्यमवर्गीय आणि लहान घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. विशेषतः झोपडपट्टी पुनर्विकास किंवा चाळ पुनर्विकास योजनांअंतर्गत मिळालेल्या छोट्या सदनिकांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना या सवलतीचा फायदा होणार आहे.महापालिकेच्या अंदाजानुसार या निर्णयामुळे सुमारे 700 कोटी रुपयांचा महसूल कमी होण्याची शक्यता आहे. तरीदेखील मुंबईतील मूळ रहिवाशांना शहरातच टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे मत मांडण्यात आले.
सभागृहात ही सूचना शिवसेना (ठाकरे गट) यांच्या यशोधर फणसे यांनी मांडली होती. ठरावानुसार पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. कायदेविषयक पडताळणी आणि आयुक्तांची अंतिम मंजुरी झाल्यानंतर अधिकृत परिपत्रक जारी करण्यात येईल.अंतिम आदेश निघाल्यानंतर 500 ते 700 चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरांना मालमत्ता करातून सवलत लागू होईल. या निर्णयामुळे मुंबईतील हजारो कुटुंबांना थेट आर्थिक फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.