नाशिक : नाशिक शहरात महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढत असतानाच सातपूर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘इव्हेंट मॅनेजमेंट’मध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका विवाहित महिलेची दोन लाख रुपयांत विक्री करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. एवढेच नव्हे तर तिच्या इच्छेविरुद्ध नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे जबरदस्तीने विवाह लावण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील कार्बन नाका परिसरात राहणारी पीडिता ही अवघ्या तीन-चार महिन्यांच्या बाळाची आई असून ती पतीपासून विभक्त आहे. 27 फेब्रुवारी रोजी राणी आणि भागी नावाच्या दोन महिलांनी तिच्याशी संपर्क साधत “चांगली नोकरी मिळवून देतो” असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला कारमधून मालेगावमार्गे नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे नेण्यात आले.
तेथे नवनाथ खिरडकर नावाच्या तरुणाकडून दोन लाख रुपये घेत तिचा जबरदस्तीने विवाह लावण्यात आल्याचा आरोप आहे. घडलेल्या प्रकाराची जाणीव होताच पीडितेने दुसऱ्या दिवशी मोबाईलवरून आईशी संपर्क साधून सर्व माहिती दिली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सातपूर पोलीस ठाणे येथील पथक तातडीने जातेगावकडे रवाना झाले. गावात सुमारे 300 जणांचा जमाव असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत महिलेची सुखरूप सुटका केली.या प्रकरणात दोन महिलांना अटक करण्यात आली असून आणखी सहा संशयित फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, नाशिक शहरात महिलांच्या आणि अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी ‘ऑपरेशन शोध’ मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन महिन्यांत 79 अल्पवयीन मुला-मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र अंबड, सातपूर आणि इंदिरानगर परिसरातून नुकत्याच तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.