नवी दिल्ली : देशातील सुमारे सात कोटी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आर्थिक वर्ष 2025-26 साठी व्याजदर 8.25 टक्के ठेवण्याची शिफारस केली आहे. हा निर्णय केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या 239 व्या बैठकीत घेण्यात आला.बैठकीस केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय, राज्यमंत्री शोभा करंदलाजे, श्रम व रोजगार विभागाच्या सचिव वंदना गुरनानी तसेच सीबीटीचे सदस्य उपस्थित होते.
व्याज खात्यात कधी जमा होणार?
ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाने व्याजदराची शिफारस केल्यानंतर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे पाठवला जातो. वित्त मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतरच संबंधित आर्थिक वर्षाचे व्याज पीएफ खात्यांमध्ये जमा केले जाते. साधारणतः आर्थिक वर्ष संपल्यानंतर काही महिन्यांत ही रक्कम खातेदारांच्या खात्यात जमा होते.
ईपीएफ खात्यातील शिल्लक रकमेवर दरमहा व्याजाची गणना केली जाते; मात्र संपूर्ण व्याजाची रक्कम आर्थिक वर्षाच्या अखेरीस एकरकमी जमा केली जाते.
सलग तिसऱ्या वर्षी दर कायम
ईपीएफओने सलग तिसऱ्या वर्षी 8.25 टक्के व्याजदर कायम ठेवला आहे. याआधी 2023-24 मध्ये व्याजदर 8.15 टक्क्यांवरून वाढवून 8.25 टक्के करण्यात आला होता. 2021-22 मध्ये 8.10 टक्के दराने व्याज देण्यात आले होते. दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य, गुंतवणूक शिस्त आणि स्पर्धात्मक परतावा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते.
निष्क्रिय खात्यांबाबत नियम
एखाद्या खात्यात सलग 36 महिने कोणतीही रक्कम जमा न झाल्यास ते खाते निष्क्रिय समजले जाते आणि त्यानंतर व्याज दिले जात नाही. त्यामुळे खातेदारांनी आपले खाते सक्रिय ठेवणे आवश्यक आहे.
लहान रकमेच्या खात्यांना ऑटो क्लेम
सीबीटीने एका पायलट प्रकल्पालाही मंजुरी दिली आहे. ज्यांच्या खात्यात 1,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी शिल्लक आहे, अशा खात्यांचे दावे स्वयंचलित पद्धतीने मंजूर करून संबंधित रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 1.33 लाख खात्यांचा समावेश असून जवळपास 5.68 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. आधार व बँक खाते लिंक असल्यास कोणताही स्वतंत्र दावा न करता रक्कम जमा होईल.
क्लेम प्रक्रियेत बदल
गेल्या वर्षभरात ईपीएफओने क्लेम सेटलमेंट प्रक्रियेत अनेक सुधारणा केल्या आहेत. ऑटो क्लेम प्रणालीमुळे पीएफ रक्कम मिळण्याची प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक झाली आहे.केंद्रीय वित्त मंत्रालयाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर 2025-26 या आर्थिक वर्षाचे व्याज खातेदारांच्या पीएफ खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मंजुरी आणि व्याज जमा होण्याच्या तारखेकडे लागले आहे.