सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
  • मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
  • राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
 शहर

पिंपरी-चिंचवडकरांना दर सोमवारी पोलीस आयुक्तांना थेट भेटण्याची संधी

अजिंक्य स्वामी    09-03-2026 15:00:55

पिंपरी-चिंचवड : नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत आता पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांना दर सोमवारी पोलीस आयुक्तांना पूर्वनियोजित अपॉइंटमेंटशिवाय थेट भेटण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या उपक्रमानुसार प्रत्येक सोमवारी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत चिंचवड येथील प्रेमलोक पार्कमधील पोलीस आयुक्तालयात नागरिकांना पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे. या बैठकीदरम्यान नागरिकांना त्यांच्या परिसरातील विविध समस्या, तक्रारी, सूचना किंवा कायदा-सुव्यवस्थेबाबतचे मुद्दे थेट पोलीस प्रशासनापुढे मांडण्याची संधी मिळणार आहे.

या बैठकीत पोलीस आयुक्तांसह संयुक्त पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि उपआयुक्त स्तरावरील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी आणि समस्यांवर तत्काळ चर्चा होऊन त्यावर आवश्यक ती कारवाई करण्याची प्रक्रिया वेगाने होण्यास मदत होणार आहे.

पोलीस प्रशासनाच्या मते, या उपक्रमामुळे नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यास मदत होईल तसेच नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास व संवाद अधिक मजबूत होईल. नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाल्याने पोलीस प्रशासनाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, उद्योजक तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपल्या समस्या थेट पोलीस प्रशासनासमोर मांडाव्यात, असे आवाहन पोलीस आयुक्तालयाने केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती