सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
  • मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
  • राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
 DIGITAL PUNE NEWS

टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर गौतम गंभीरचा मोठा सन्मान; ‘हा विजय द्रविड-लक्ष्मण यांना समर्पित’

डिजिटल पुणे    09-03-2026 16:20:08

अहमदाबाद : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी टी-20 विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी करत पुन्हा एकदा विजेतेपद पटकावले. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला. यासोबतच भारताने एकूण तिसऱ्यांदा हा किताब जिंकत नवा विक्रमही प्रस्थापित केला.विजयानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गंभीर यांनी या यशाचे श्रेय माजी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना दिले.

संघाला या पातळीपर्यंत पोहोचवण्यात राहुल द्रविड यांचे मोठे योगदान आहे. तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तरुण खेळाडू तयार करण्यात व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असे गंभीर यांनी सांगितले. त्यामुळे हा विश्वचषक त्या दोघांना समर्पित करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कर्णधार सूर्यकुमार यादवनेही या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. आज जे घडले आहे ते पूर्णपणे समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण संघासाठी हा अतिशय खास क्षण आहे, असे तो म्हणाला. 2024 च्या विश्वचषकानंतर संघाचा हा प्रवास सुरू झाला आणि सर्वांनी दाखवलेल्या विश्वासामुळे संघाला यश मिळाले, असेही त्याने नमूद केले.

न्यूझीलंडचा डाव ढासळला

256 धावांचे मोठे लक्ष्य गाठताना न्यूझीलंडच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव दिसून आला. टिम सीफर्ट आणि फिन अ‍ॅलन यांनी 31 धावांची सुरुवात केली; मात्र त्यानंतर विकेट्सचा पाऊस सुरू झाला. सीफर्टने 26 चेंडूत 52 धावांची खेळी करत सर्वाधिक धावा केल्या. डॅरिल मिचेलने 17 धावा, तर कर्णधार मिचेल सॅन्टनरने 43 धावांची झुंज दिली.

भारतीय गोलंदाजांनी मात्र प्रभावी मारा करत कीवी संघाची घसरण रोखली. जसप्रीत बुमराहने 4 विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने 3 बळी घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा मोडला. परिणामी भारताने 96 धावांनी विजय मिळवत विश्वचषकावर आपले नाव कोरले.

 


 Give Feedback



 जाहिराती