सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पुण्यातील हॉटेल बंद होण्याची शक्यता; नोकरदार, विद्यार्थी अन् नागरिकांची तारांबळ
  • ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
  • विश्वविजेत्या टीम इंडियाचा मुंबईत पुन्हा भव्य रोड शो; तारीखही आली समोर, BCCI लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
 जिल्हा

महाराष्ट्र आणि मॉरिशसमधील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील – पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

डिजिटल पुणे    10-03-2026 12:27:54

मुंबई : कृषी व पणन क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबरोबरच, प्रवासी भारतीय संपर्क, द्विपक्षीय व्यापार, थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) तसेच इथेनॉल उत्पादन, सौरऊर्जेवर आधारित नवीकरणीय ऊर्जा, कोल्ड चेन पायाभूत सुविधा तसेच फूड व फार्मा पार्कच्या विकासासाठी महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येईल, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.भारतातील मॉरिशसच्या उच्चायुक्त शिलाबाई बप्पू यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यातील सहकार्य अधिक मजबूत करण्यासह विविध विषयांवर चर्चा केली.

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्रातून मॉरिशसला फळे, भाजीपाला आणि धान्याची निर्यात सुलभ करण्यासाठी राज्याच्या कृषी व पणन यंत्रणेमार्फत सुलभ प्रक्रिया निर्माण करण्याच्या संधी अधोरेखित केल्या. प्रवासी भारतीयांशी संपर्क वाढवण्यालाही चर्चेत महत्त्व देण्यात आले. मॉरिशसमधील मराठी वंशाच्या समाजासाठी मराठी भाषा शिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि संस्थात्मक संबंध अधिक दृढ करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याबाबत यावेळी विचारविनिमय झाला.

मॉरिशसच्या उच्चायुक्तांनी मंत्री जयकुमार रावल यांना मॉरिशसला भेट देण्याचे निमंत्रण देत प्रवासी भारतीय संपर्क आणि कृषी व्यापार क्षेत्रातील सहकार्य पुढे नेण्याबाबत सकारात्मक चर्चा केली.या बैठकीत भारत-मॉरिशस यांच्यातील मजबूत द्विपक्षीय संबंधांचाही उल्लेख करण्यात आला. विकास सहकार्य, व्यापार भागीदारी तसेच मुंबईमार्फत वाढणारे आर्थिक संबंध यावरही चर्चा झाली. तसेच भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट पॉलिसी’ला महाराष्ट्राचे पाठबळ असल्याचे सांगून राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट यांसारख्या बंदरांद्वारे सागरी वाहतूक आणि आर्थिक सहकार्य वाढवण्याचीही तयारी दर्शवली.


 Give Feedback



 जाहिराती