पुणे : पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-४ ने मोका गुन्ह्यातील तब्बल ९ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार नागेश्वर कुंवर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली. मोका गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आदित्य उर्फ सोन्या कांबळे हा मोहननगर, चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव आदित्य उर्फ सोन्या कांबळे (वय २७, रा. म्हसोबा मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) असे सांगितले.
सदर आरोपीविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून त्याच्यावर भारतीय दंड संहिता तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत गुन्हा नोंद आहे. अटकेनंतर पुढील कारवाईसाठी आरोपीला येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस आयुक्त, उपायुक्त गुन्हे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव आणि त्यांच्या पथकाने केली.