नवी दिल्ली: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर त्याबाबत पारदर्शक चौकशीची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिल्लीमध्ये विविध राजकीय नेत्यांची भेट घेऊन या प्रकरणी पाठपुरावा सुरू केला आहे. बुधवारी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत या अपघाताच्या तपासाबाबत चर्चा केली.
अजित पवार यांच्या मृत्यूमागे नेमके कारण काय, हा प्रश्न उपस्थित होत असून हा अपघात होता की घातपात, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात संसदेतही मुद्दा उपस्थित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.
या आधी रोहित पवार यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही भेट घेतली होती. तसेच इंडिया आघाडीतील इतर नेत्यांशीही चर्चा करून पारदर्शक चौकशीसाठी पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचीदेखील मदत घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गडकरी यांच्याशी झालेल्या भेटीत विकास प्रकल्पांना अजित पवार यांचे नाव देण्याबाबतही चर्चा झाली. पुणे रिंग रोड, तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्ग तसेच पुणे-शिरूर उन्नत महामार्ग या प्रकल्पांना अजित पवार यांचे नाव देण्याची विनंती करण्यात आल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. यावर गडकरी यांनी अशा नामकरणासाठी निश्चित प्रक्रिया असल्याचे सांगत आवश्यक प्रस्ताव सादर केल्यास त्यावर विचार केला जाईल, असे आश्वासन दिल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय, अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी रोहित पवार यांनी राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांचीही सर्वोच्च न्यायालयात भेट घेतली. या वेळी संबंधित कागदपत्रे त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली असून पुढील कायदेशीर पर्यायांवर मार्गदर्शन घेतल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, संसदेत या विषयावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न झाला असला तरी त्यास अपेक्षित संधी मिळालेली नसल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. मात्र, कितीही अडथळे आले तरी या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.