बेळगाव: सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून श्रीमंत व्यक्तींना हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटणाऱ्या एका फॅशन डिझायनर महिलेला बेळगावमधील टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे. दीपा अवतगी (वय 33, रा. महालिंगपूर, जि. बागलकोट) असे अटकेतील महिलेचे नाव असून तिचा साथीदार शिवानंद मठपती सध्या फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानंद हा बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील रहिवासी असून तो श्रीमंत लोकांची माहिती दीपाला पुरवत असे. त्यानंतर दीपा इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्या व्यक्तींशी ओळख करून घेत असे. पुढे संवाद वाढवत त्यांना बेळगावमधील एका लॉजमध्ये भेटण्यासाठी बोलावले जात असे.
लॉजमध्ये बोलावलेल्या व्यक्तीला दीपा आंघोळ करून येण्यास सांगायची. संबंधित व्यक्ती बाथरूममध्ये गेल्यानंतर ती बाहेरून दरवाजा बंद करून त्याचा मोबाईल, रोख रक्कम आणि वाहनाच्या चाव्या घेऊन पळ काढत असे. या प्रकारातील काही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाल्या आहेत.
यानंतर ती दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून त्या व्यक्तीशी संपर्क साधून पैशांची मागणी करत असे. पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी टिळकवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक परशुराम पूजेरी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दीपाला अटक केली.
32 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 32 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात एक फॉर्च्युनर कार, एक मारुती सुझुकी एस-क्रॉस कार, 11 मोबाईल फोन, एक टॅब, एक डोंगल, तीन वाहनांच्या चाव्या तसेच 14 हजार रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे. फरार आरोपी शिवानंद मठपतीचा पोलीस शोध घेत आहेत.