बारामती : राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून त्यांनी आज सकाळी बारामतीतील ‘सहयोग’ निवासस्थानी ‘जनता दरबार’ आयोजित केला. या उपक्रमाद्वारे त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या थेट ऐकून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यावर त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
सकाळी साडेआठच्या सुमारासच ‘सहयोग’ परिसरात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. बारामती तालुक्यातील अनेक गावांमधून नागरिक आपले प्रश्न मांडण्यासाठी आले होते. यामध्ये महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी होती. विशेषतः ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेशी संबंधित अडचणी, स्थानिक नागरी प्रश्न आणि वैयक्तिक तक्रारी महिलांनी मांडल्या.
सुनेत्रा पवार यांनी प्रत्येकाची समस्या संयमाने ऐकून घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ती प्राधान्याने सोडवण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे अनेक नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.दरम्यान, बारामती वकील संघटनेच्या प्रतिनिधींनीही सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन व्यावसायिक आणि प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा केली.
‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेच्या मानाच्या गदेची पूजा
जनता दरबार सुरू असताना पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे होणाऱ्या आगामी महाराष्ट्र केसरी कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेच्या आयोजकांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या हस्ते स्पर्धेतील मानाच्या गदेची पूजा करण्यात आली.कुस्ती हा महाराष्ट्राच्या परंपरेचा महत्त्वाचा भाग असून अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना मोठे व्यासपीठ मिळते, असे मत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले. तसेच राज्यातील कुस्ती परंपरेला पुढे नेण्यासाठी कायम पाठिंबा देण्याचे आश्वासन त्यांनी आयोजकांना दिले.