रायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात शुक्रवारी सकाळी गंभीर रस्ते अपघाताची घटना घडली. नमाज अदा करण्यासाठी जात असलेल्या कामगारांना घेऊन जाणारा पिकअप टेम्पो बोरघर पुलाजवळ पलटी झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गॅस प्राधिकरणाशी संबंधित कंपनीत काम करणारे काही कर्मचारी नमाजासाठी अलिबाग तालुक्यातील रामराज परिसरात जात होते. यावेळी 21 जण प्रवास करत असलेला पिकअप टेम्पो अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उलटला. अपघात इतका भीषण होता की एकाचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातात जखमी झालेल्या सर्वांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.