सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
  • संकट काळात भारतानं शेजारधर्म पाळला! अडचणीत असलेल्या बांगलादेशला मदतीचा हात, तब्बल 40 हजार टन इंधनाचा पुरवठा करणार
  • गॅस टंचाईनंतर आता बेरोजगारीची लाट, आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्या जाणार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
 जिल्हा

बचत गटांना सक्षम करण्याचा निर्धार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

डिजिटल पुणे    16-03-2026 14:55:52

कोल्हापूर : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या ‘ताराराणी महोत्सव’ व ‘मिनी सरस’ जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील सासने मैदानावर आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले आणि त्यानंतर सर्व विक्री स्टॉल्सना भेट देऊन महिलांच्या उत्पादनांची पाहणी केली.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, अशा प्रकारच्या प्रदर्शनांच्या आयोजनातून महिला भगिनी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ही मोठी संधी उपलब्ध करून दिली जात असून महिलांना कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जात आहे. मात्र, हा निधी केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता तो गटातील प्रत्येक महिला सदस्याच्या स्वप्नांना पाठबळ देणारा ठरावा. प्रत्येक बचत गटाने आपल्या सर्व सदस्यांचे हित जोपासत कार्य करणे आवश्यक आहे. जर ग्रामीण भागातील पतसंस्था आणि बँका अधिक सक्षम झाल्या तर खासगी सावकारी पूर्णपणे संपुष्टात येईल आणि त्यातून समाजाचा आर्थिक स्तर अधिक भक्कम होईल. बचत गटांसाठी हा उपक्रम केवळ एक उत्सव न राहता, त्यांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी व सक्षम करण्याचा निर्धार आपण सर्वांनी मिळून करूया, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

जिल्ह्यातील प्रशासकीय कामांचा गौरव करताना ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या कामांना गती मिळाली असून, स्थानिक व शहरी प्रशासनाच्या सहकार्याने हे अभियान यशस्वी झाले आहे. विशेषतः जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जो दहा लाख रुपयांचा विमा कवच दिला जात आहे, ही राज्यातील पहिलीच घटना असून ती संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरणार आहे. यावेळी पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते भुदरगड तालुक्यातील बचत गटांना 3 कोटी ७३ लाख, राधानगरी तालुक्यात ६ कोटी ८७ लाख, करवीर तालुक्यासाठी १४ कोटी १ लाख तर हातकणंगले तालुक्यासाठी ४ कोटी ५१ लाख रूपयांचा समुदाय गुंतवणूक निधीचे बचत गटांना वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी केले, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले यांनी छत्रपती शाहू महाराज ग्रामपंचायत कर्मचारी विमा योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. याच प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात काही कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते अपघाती विमा कवच प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या सोहळ्याला आमदार अशोकराव माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले, ओमप्रकाश यादव, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, कल्याण निकम यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.हा ताराराणी महोत्सव १८ मार्चपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार असून, कोल्हापूरच्या नागरिकांनी या ठिकाणी भेट देऊन महिलांच्या कर्तृत्वाचे, कौशल्याचे आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे कौतुक व खरेदी करून त्यांना पाठबळ द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती