पुणे : मध्यपूर्वेत इराण, इस्रायल आणि अमेरिकेदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधनपुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम भारतातही जाणवू लागल्याचे चित्र असून अनेक ठिकाणी एलपीजी गॅस सिलेंडर मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही भागात गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्याचेही दिसत आहे.
या परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने गॅस वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्हा प्रशासनाला गॅस एजन्सी, सिलेंडर वाहतूक करणारी वाहने आणि वितरण कर्मचाऱ्यांना आवश्यक ते पोलिस संरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. काही ठिकाणी वितरकांवर हल्ल्याच्या घटना घडल्याने ही खबरदारी घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागाने परिपत्रक जारी केले असून गॅसचा पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत ही उपाययोजना लागू राहणार आहे. तसेच जिल्हास्तरावर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत राहणार असून त्यामध्ये पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त यांचा समावेश असेल.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात गॅसची टंचाई नसल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून गॅस साठवू नये आणि एजन्सीबाहेर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. काही राजकीय घटकांकडून भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.तरीही पुण्यातील काही भागांमध्ये सोमवारी सकाळपासूनच नागरिकांनी एलपीजी सिलेंडरसाठी एजन्सीबाहेर रांगा लावल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.