सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजितदादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेता, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढण्याबाबत लवकरच निर्णय : लक्ष्मण हाके
  • गॅसऐवजी इथेनॉलचा वापर शक्य? कोपरगावमध्ये साखर कारखान्याचा अनोखा प्रयोग, इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन
  • सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
  • संकट काळात भारतानं शेजारधर्म पाळला! अडचणीत असलेल्या बांगलादेशला मदतीचा हात, तब्बल 40 हजार टन इंधनाचा पुरवठा करणार
  • गॅस टंचाईनंतर आता बेरोजगारीची लाट, आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्या जाणार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
 विश्लेषण

गॅसला पर्याय ठरणार का इथेनॉल? कोपरगावच्या साखर कारखान्यात इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचा अनोखा प्रयोग

डिजिटल पुणे    16-03-2026 17:29:21

पुणे : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर दिसू लागला असून त्याचे पडसाद भारतातही उमटत आहेत. सध्या घरगुती एलपीजीचा पुरवठा सुरळीत असला तरी व्यावसायिक गॅसच्या उपलब्धतेबाबत अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर इंधनाचे पर्यायी स्रोत शोधण्याचे प्रयत्नही वेगाने सुरू झाले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात संजीवनी उद्योग समूह आणि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना यांनी अशाच एका अभिनव प्रयोगाला सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत इथेनॉलवर चालणाऱ्या विशेष स्टोव्हचे संशोधन करण्यात आले आहे. पुण्यातील एका संशोधन संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प विकसित करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याच्या व्यवस्थापनाने दिली.

यापूर्वी या साखर कारखान्यात सीएनजी निर्मितीसाठी प्रकल्प उभारण्यात आला असून आता व्यावसायिक गॅसला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पारंपरिक गॅसच्या तुलनेत इथेनॉल स्टोव्हचा खर्च तुलनेने कमी असून तो वापरणेही अधिक किफायतशीर ठरू शकते, असा दावा संशोधनाशी संबंधितांकडून करण्यात येत आहे.

कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सांगितले की, देशात सध्या इथेनॉल उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची धोरणे लागू झाल्यानंतरही अंदाजे 1000 कोटी लिटरपर्यंत अतिरिक्त इथेनॉल उपलब्ध आहे. त्यामुळे सरकारने इथेनॉल गॅस किंवा इथेनॉलवर चालणाऱ्या उपकरणांना धोरणात्मक मान्यता दिल्यास सहकार क्षेत्राला मोठी चालना मिळू शकते.

त्यांच्या मते, अशा प्रकल्पांना परवानगी मिळाल्यास इंधन वाहतुकीवरील खर्चही मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो आणि आयात होणाऱ्या इंधनावरील अवलंबित्वही घटू शकते. केनिया सारख्या देशांमध्ये लाखो घरांमध्ये इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचा वापर होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. सुमारे दोन वर्षांपूर्वी पुण्यातील एका कंपनीसोबत करार करून या स्टोव्हचे संशोधन पूर्ण झाले असले तरी स्पष्ट सरकारी धोरण नसल्यामुळे सध्या हा प्रकल्प पुढे नेण्यास अडथळे येत आहेत.

दरम्यान, देशात आत्मनिर्भर ऊर्जा व्यवस्थेच्या दिशेने प्रयत्न सुरू असताना अशा प्रकारच्या संशोधनांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. योग्य धोरणात्मक निर्णय घेतल्यास ऊस उत्पादक शेतकरी भविष्यात ऊर्जादाता म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा विश्वास या प्रकल्पाशी संबंधितांनी व्यक्त केला आहे.


 Give Feedback



 जाहिराती