पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नियोजन आणि विकास मंडळाच्या गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत 'सायबर सुरक्षा आणि सायबर स्वच्छता' यावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्व. बाबुरावजी घोलपसाहेब, स्व. अनंतराव पवार, स्व. अजितदादा पवार यांचे प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मा. श्री. धनंजय देशपांडे (सायबर तज्ज्ञ आणि संचालक सायबर अवेरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य) , प्रा. डॉ. आर. जी. पवार ( संचालक, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो, प्रा. भरत कानगुडे, डॉ. तानाजी काशीद, प्रा. हेमंत उबाळे आदी उपस्थित होते.कार्यशाळेचे प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक डॉ. तानाजी काशीद यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी कार्यशाळा आयोजनामागील भूमिका आणि तिचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक सायबरतज्ज्ञ धनंजय देशपांडे यांनी दृकश्राव्य माध्यमातून विविध सत्यघटनेतील दाखले देत आणि सादरीकरण करत सायबर सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.गरज नसताना आपले इंटरनेट बंद करावे, दुबार पद्धतीने काढण्यात येणारे बँक अकाउंट, आधार कार्ड यावर आपले लक्ष हवे. स्वतः कुटुंबातील व्यक्तींसोबत फोनवर बोलताना टोपण नावाचा वापर करावा, व्हिडिओ कॉलची खात्री करावी,समाजमाध्यमातील हनी ट्रॅपचा सापळा,त्यातून सुरक्षा,वेगवेगळे बँक खाती सुरक्षित पद्धतीने वापरावीत, गुगल लोकेशनचा कमीतकमी वापर करावा, आपल्या मोबाईलमध्ये अँटीव्हायरस वापरावे, आपली वैयक्तिक खासगी माहिती सार्वजनिक करू नये, प्रवास, अद्यावत माहितीचे स्टेटस ठेवू नयेत. त्यांनी सायबर चोरट्यांकडून आपली फसवणूक कशा पद्धतीने होते, कोणकोणत्या कारणांनी होते हे देखील सांगितले. यामध्ये त्यांनी डिजिटल ऍरेस्ट,मोबाईल एक्सचेंज फ्रॉड, लाईटबिल तसेच ई-चलन, गव्हर्मेंट सेवा बंद करण्याबाबतचे कॉल, अपघाताबाबतचे फ्रॉड, प्रॉडक्ट क्यू आर कोड आदीची माहिती सांगतानाच आधारकार्डचा वापरही आपण कसा केला पाहिजे हे सांगितले. मास्क आधारकार्डचा वापर प्रभावी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. प्रासंगिक घटनेनुसारही सायबर चोरटे आपली फसवणूक करत असतात म्हणून यावेळी सावध राहावे. मजबूत पासवर्ड कसा असावा या संदर्भातही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.पुढे त्यांनी उपस्थितांनी विचारलेल्या शंकाचे निरसन केले.
डॉ. आर. जी. पवार यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कायदा तसेच नेटवर्क त्यामधील जागा, भारतातील कायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.प्राचार्यडॉ.बी.जी.लोबो यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात माहिती तंत्रज्ञानाचा प्रचंड स्फोट होत असताना जग जवळ आले आहे.मानवी जीवन सुलभ झाले आहे; परंतु त्याचबरोबर सायबर गुन्हेगारी वाढली आहे.आपण कोणीही सुरक्षित नाही.त्यामुळे ही राज्यस्तरीय कार्यशाळा यादृष्टीने खूपच महत्त्वाची आहे.त्यांनी विविध महाविद्यालयातून आलेल्या सर्व उपस्थित प्राध्यापक,संशोधक, अभ्यासक यांचे आभार मानले.या राज्यस्तरीय कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ.विजय बालघरे,डॉ.नम्रता आल्हाट, डॉ. मिनाली चव्हाण यांनी केले.महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही राज्यस्तरीय कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.