सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अवकाळी पावसाचा राज्यभर तडाखा; गारपीट-विजांच्या कडकडाटाने पिकांचे मोठे नुकसान
  • थेट अमेरिकेच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानावर संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या! सुरक्षेसाठी तातडीची बैठक बोलावली; दोन्ही नेत्यांच्या शिफ्टिंगचा विचार
 विश्लेषण

अवकाळी पावसाचा राज्यभर तडाखा; गारपीट-विजांच्या कडकडाटाने पिकांचे मोठे नुकसान

डिजिटल पुणे    20-03-2026 11:51:47

नागपूर  : राज्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावत अनेक जिल्ह्यांत हाहाकार माजवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भाग या नैसर्गिक संकटाच्या विळख्यात सापडले आहेत.

नागपूरसह परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. हवामान विभागाने पुढील काही दिवस अवकाळी परिस्थिती कायम राहण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, सोलापूरमध्ये मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला, ज्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि आसपासच्या भागात अचानक वातावरण बदलून जोरदार पाऊस झाला. याचा फटका काढणीस तयार असलेल्या कांदा, गहू आणि हरभरा पिकांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बुलढाणा जिल्ह्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, गहू तसेच केळी, संत्री आणि लिंबू यांसारख्या फळबागांना मोठा फटका बसला आहे. जालना, जळगाव आणि बीड जिल्ह्यांतही पावसासह गारांचा मारा झाल्याने गहू, ज्वारी, मका आणि भाजीपाला पिके जमीनदोस्त झाली आहेत.

परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे आंब्यांच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून फळांची मोठ्या प्रमाणावर गळ झाली आहे. यामुळे यंदाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकूणच, काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या रब्बी पिकांवर अवकाळी पावसाने घाला घातल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. राज्यभरातून तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे.


 Give Feedback



 जाहिराती