पिंपरी-चिंचवड : लेह-लडाख सहलीवर गेलेल्या पिंपरी-चिंचवडमधील तरुणांच्या ग्रुपवर दुर्दैवाचा डोंगर कोसळला. राजस्थानमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात तिघा मित्रांचा मृत्यू झाला असून, मोबाइलमधील इमर्जन्सी ‘कार क्रॅश’ अलर्टमुळे या दुर्घटनेची माहिती तात्काळ समोर आली.
रावेत येथील सार्थक तुपे याला सकाळी अचानक मोबाईलवर अपघाताचा ऑटोमॅटिक संदेश मिळाला. या मेसेजनंतर तो चिंतेत पडला आणि त्याने तातडीने इतर मित्रांशी संपर्क साधला. काही वेळातच अपघातात कुणाल चोरडिया, मयुरेश पाडाळे आणि सिद्धांत आल्हाट यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
ही सर्व मंडळी तीन कारमधून लेह-लडाखकडे फिरायला निघाली होती. महामार्गावर काही अंतरावर दोन कार थांबल्या असताना पुढे गेलेल्या कारचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली होती. स्थानिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिघांनाही वाचवता आले नाही.
दरम्यान, या सहलीत सहभागी होणाऱ्या एका तरुणाला प्रवासादरम्यान अस्वस्थ वाटल्याने तो एक दिवस आधीच विमानाने घरी परतला होता. योगायोगाने तो ज्या कारमधून प्रवास करत होता, त्याच कारचा अपघात झाला. त्यामुळे तो थोडक्यात बचावला.
या घटनेची माहिती मिळताच संबंधितांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पिंपरी-चिंचवड परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, मृतदेह पुण्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती मदत केली जात असल्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिली आहे.ही घटना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपत्कालीन परिस्थितीत माहिती किती वेगाने पोहोचू शकते, याचे उदाहरण ठरली असली तरी, एका आनंददायी सहलीचा शेवट अत्यंत दुर्दैवी ठरला.