सोलापूर : अवकाळी पाऊस आणि गारपीटीच्या तडाख्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे हिरव्यागार द्राक्षबागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्या असून उभे पीक आडवे पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पडसाळी गावातील शेतकरी अंकुश शिरसाट यांच्या सुमारे साडेतीन एकरांवरील द्राक्षबाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. अनेक महिन्यांची मेहनत काही क्षणांत वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या भावना अनावर झाल्या. आपली शेती दाखवताना शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहताना दिसले.
पाहणीदरम्यान शेलार यांनी शेतकऱ्यांना धीर देत शासन त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिक मदत मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.प्राथमिक माहितीनुसार, उत्तर सोलापूर परिसरात सुमारे ४०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून याबाबत कृषीमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.