सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
  • इराण-अमेरिका तणाव पुन्हा टोकाला; ट्रम्प यांची बॉम्बहल्ल्याची चेतावणी, इराणच्या दोन अटींना नकार
  • तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहेतील ‘शक्तिवर्धक मध’, एक किलोची बाटली 9 लाखांना विकून भाविकांना गंडा; अशोक खरातचा आणखी एक कारनामा
 क्राईम

नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरण उघड: अशोक खरातच्या बनावट ‘दैवी शक्ती’चा भंडाफोड, SIT तपासात धक्कादायक खुलासे

डिजिटल पुणे    24-03-2026 12:08:01

नाशिक : नाशिकमध्ये समोर आलेल्या भोंदूबाबा प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अशोक खरात याची विशेष तपास पथकाकडून (SIT) सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू असून, अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागत आहेत. तपास पथक प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सखोल चौकशी केली जात आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, खरात आपल्या तथाकथित ‘दैवी शक्ती’चा प्रभाव निर्माण करण्यासाठी विविध बनावट प्रकार वापरत होता. तो भक्तांना रबरी साप, नकली वाघाचे कातडे दाखवून घाबरवत असे. मिरगाव परिसरातील मंदिरात यासाठी खास व्यवस्था केली जात होती. या भीतीच्या वातावरणामुळे अनेक जण त्याच्या प्रभावाखाली येत आणि काहींना बेशुद्ध पडण्यासारखे प्रकारही घडले.

याशिवाय, तो भक्तांना मंदिरामागील जंगलात पूजेसाठी बोलावून अघोरी विधी करत असल्याचे समोर आले आहे. या प्रक्रियेत तो लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असे. विशेष म्हणजे, ‘मंत्रशक्ती असलेले’ म्हणून तो चिंचोके तब्बल एक लाख रुपयांना विकत असल्याचाही आरोप आहे.

अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी असून, स्वतःला अंकशास्त्रज्ञ आणि कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ म्हणून सादर करत होता. त्याच्या संपर्कात अनेक राजकारणी, अधिकारी आणि सेलिब्रिटी असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

दरम्यान, एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याच्या आरोपावरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे समाजात संताप व्यक्त होत असून, तपासातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती