सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
  • इराण-अमेरिका तणाव पुन्हा टोकाला; ट्रम्प यांची बॉम्बहल्ल्याची चेतावणी, इराणच्या दोन अटींना नकार
  • तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहेतील ‘शक्तिवर्धक मध’, एक किलोची बाटली 9 लाखांना विकून भाविकांना गंडा; अशोक खरातचा आणखी एक कारनामा
 क्राईम

पुण्यात पुन्हा गुन्हेगारीचा कहर; मारहाण, घरफोडी आणि चोरीच्या घटना वाढल्या

डिजिटल पुणे    24-03-2026 14:15:31

पुणे : पुणे शहरात गेल्या 24 तासांत विविध भागांत मारहाण, घरफोडी आणि चोरीच्या घटनांची नोंद झाली असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिस आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या दैनिक गुन्हे प्रेसनोटनुसार शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २३ मार्च २०२६ रोजी पुणे शहरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले असून, मारहाण, घरफोडी, चोरी आणि दहशत निर्माण करण्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 कोंढवा परिसरात जीवघेणा हल्ला, दहशत निर्माण

येवलेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भोलेनाथ चौक, कोंढवा येथे मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या वादातून काही तरुणांनी एका २० वर्षीय युवकावर लोखंडी हत्यार आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला.या घटनेत पीडित युवक गंभीर जखमी झाला असून आरोपींनी परिसरात वाहनांची तोडफोड करत हवेत हत्यारे फिरवून दहशत निर्माण केली. या प्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर काहीजण फरार आहेत.

कोथरुडमध्ये घरफोडी; दागिने व रोख रक्कम लंपास

कोथरुड परिसरातील म्हातोबा मंदिराजवळील एका फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली.फिर्यादी बाहेर असताना घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि सुमारे ३६,६०० रुपयांचा ऐवज (रोख व दागिने) चोरून नेला. पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.

 बिबवेवाडीत तरुणांमध्ये हाणामारी

बिबवेवाडी परिसरात आराधना स्वीट्स समोर झालेल्या भांडणात काही तरुणांनी काठ्या, दगड आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली.या घटनेत एक युवक जखमी झाला असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

 बस प्रवासात सोन्याची बांगडी चोरी

वारजे जकात नाका ते कर्वे पुतळा दरम्यान पीएमपीएमएल बसमध्ये प्रवास करत असलेल्या ६७ वर्षीय महिलेची ७०,००० रुपयांची सोन्याची बांगडी चोरीला गेली.गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ही चोरी केल्याची माहिती असून पोलीस तपास सुरू आहे.

 नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित पोलीसांना देण्याचे आवाहन केले आहे. पुण्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती