सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पु ल देशपांडे यांच्यानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 'कोट्या'धीश, त्यांच्या कोट्या पुन्हा ऐकायला मिळोत; फडणवीसांकडून ठाकरेंचं कौतुक
  • मोठी बातमी : भोंदूबाबा अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
  • देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
  • इराण-अमेरिका तणाव पुन्हा टोकाला; ट्रम्प यांची बॉम्बहल्ल्याची चेतावणी, इराणच्या दोन अटींना नकार
  • तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहेतील ‘शक्तिवर्धक मध’, एक किलोची बाटली 9 लाखांना विकून भाविकांना गंडा; अशोक खरातचा आणखी एक कारनामा
 जिल्हा

अरबी समुद्रावर पाटील कुटुंबाची मोहोर! स्वराज पाटीलने ३६ कि.मी.चे 'धर्मतर ते गेटवे' अंतर ९ तास ४९ मिनिटांत कापले

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    24-03-2026 17:11:53

उरण : जिद्द, चिकाटी आणि अंगात असलेल्या उपजत जलतरण कौशल्याच्या जोरावर उरणच्या स्वराज सोनाली संतोष पाटील या तरुण जलतरणपटूने अरबी समुद्रात एक नवा इतिहास रचला आहे. 
स्वराजने मध्यरात्री बरोबर २:०० वाजता धर्मतर जेटीवरून समुद्रात उडी मारून आपल्या या आव्हानात्मक मोहिमेला सुरुवात केली. अथांग समुद्राच्या गडद अंधारात आणि लाटांशी झुंज देत स्वराजने धर्मतर ते गेटवे ऑफ इंडिया हे तब्बल ३६ किलोमीटरचे अंतर केवळ ९ तास ४९ मिनिटांत यशस्वीपणे पार केले. 
 
स्वराजसाठी 'धर्मतर ते गेटवे' ही मोहीम अचानक मिळालेले यश नाही, तर त्यामागे त्याची टप्प्याटप्प्याने केलेली तयारी आहे. याआधी त्याने 'मोरा ते गेटवे ऑफ इंडिया' हे अंतर यशस्वीपणे पोहून पार केले होते. त्यानंतर त्याने 'कासा खडक ते खांदेरी किल्ला' या ऐतिहासिक जलमार्गावरही आपली मोहोर उमटवली होती. या लहान पण आव्हानात्मक मोहिमांमधील यशामुळेच त्याला ३६ कि.मी.च्या या महा-मोहिमेसाठी आत्मविश्वास मिळाला.
 
स्वराजचे हे यश केवळ वैयक्तिक नसून, ते एका 'जलतरणपटू कुटुंबाच्या' परंपरेचा भाग आहे. स्वराजला हा वारसा त्याची आई सोनाली संतोष पाटील यांच्याकडून मिळाला आहे, ज्यांनी २५ वर्षांपूर्वी याच मार्गावर पोहून आपली ओळख निर्माण केली होती. या मोहिमेत स्वराजला मामा संतोष पाटील, मामा जयेश पाटील आणि भाऊ राज पाटील यांचे मोलाचे प्रोत्साहन मिळाले. त्याला अनुभवी प्रशिक्षक मामा हितेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
 
धर्मतर ते गेटवे हा समुद्री मार्ग जलतरणपटूंसाठी अत्यंत कठीण मानला जातो. मध्यरात्री २ वाजता सुरू झालेल्या या मोहिमेत सुरुवातीचे काही तास स्वराजला पूर्णतः अंधारात पोहावे लागले. वाटेत येणारे भरती-ओहोटीचे प्रवाह, जेलीफिशचा धोका आणि मोठ्या जहाजांची वर्दळ या सर्वांवर मात करत स्वराजने सातत्य राखले. प्रशिक्षक मामा हितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या कठोर सरावाचे फळ आज स्वराजला मिळाले आहे.
 
जसा स्वराज गेटवे ऑफ इंडियाच्या पायऱ्यांजवळ पोहोचला, तसा तिथे उपस्थित असलेल्या कुटुंबियांनी जल्लोष केला. "आईने २५ वर्षांपूर्वी जे स्वप्न पाहिले होते, ते आज मी पूर्ण करू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे," अशा भावना स्वराजने विजयानंतर व्यक्त केल्या. एकाच कुटुंबातील आई, आजोबा, भाऊ, मामा आणि आता स्वतः स्वराज अशा सर्वांनीच समुद्रावर आपले नाव कोरल्यामुळे पाटील कुटुंब हे खऱ्या अर्थाने 'समुद्रपुत्र' म्हणून ओळखले जात आहे.स्वराजच्या या कामगिरीमुळे आगामी काळात जागतिक स्तरावरील इंग्लिश चॅनेल (English Channel) सारख्या कठीण स्पर्धांसाठी त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
 


 Give Feedback



 जाहिराती