मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलेल्या निवेदनात अशोक खरात प्रकरणातील गंभीर बाबी उघड केल्या. स्वतःला ‘दैवी अवतार’ असल्याचे सांगत आरोपीने अनेक महिलांची फसवणूक व शोषण केल्याचा आरोप असून, या प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ गुन्हे दाखल झाले आहेत. तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आरोपी महिलांना धमकावत आणि अंधश्रद्धेचा आधार घेत त्यांच्यावर अत्याचार करत होता. काही प्रकरणांत महिलांना ब्लॅकमेल करून मोठी रक्कम उकळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. नाशिक येथील पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हे नोंदवण्यात आले असून, संबंधित पीडित महिलांचे समुपदेशन करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
स्वतःला दैवी अवतार असल्याचा दावा करून महिलांची फसवणूक आणि शोषण केल्याचा गंभीर आरोप असलेल्या अशोक खरात प्रकरणात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने धार्मिक विधींच्या नावाखाली महिलांवर अमानुष वर्तन केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ गुन्हे नोंदवण्यात आले असून तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. पीडित महिलांना विश्वासात घेऊन, त्यांची ओळख गुप्त ठेवत आणि समुपदेशन करून तक्रारी दाखल करण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली.
अशोक खरात प्रकरणात आरोपीने महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाच कोटी मागितले होते. या प्रकरणात नाशिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी नीरज जाधव याने एआय फोटो व्हायरल केला नंतर डिलीट केला. त्यामुळे संबंधित महिलेला नीरज जाधवच्या विरोधात पुरावा देता आला नाही. परंतु या प्रकरणातील पीडित महिलांना विश्वासात घेऊन, त्यांचे समुपदेशन करून, कोणतीही ओळख सार्वजनिक न करता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून तपास सुरू आहे.
सरकार वाडा पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने तक्रार केली. या महिलेला गुंगीचे औषध देऊन, तिच्या नवऱ्याला मारून टाकेन अशी धमकी देत वारंवार बलात्कार करण्यात आला. अशोक खरात हा महिलांना संमोहित करायचा. विधीच्या नावाखाली त्यांच्या पोटावरून हात फिरवायचा, त्यांच्या योनीत बोट घालायचा. तीर्थाच्या नावाखाली त्यांना लघवी पाजायचा. तसेच आपण दैवी अवतार असल्याचं सांगत या प्ररकरणाची वाच्यता कुठे केल्यास दैवी कोप होईल अशी धमकी द्यायचा.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांना धमकावून त्यांचे फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत मोठी खंडणी मागत होता. काही प्रकरणांत गुंगीचे औषध देऊन तसेच कुटुंबीयांना इजा करण्याची धमकी देत त्यांच्यावर अत्याचार केल्याचेही समोर आले आहे.
पोलीस कारवाईत मोठ्या प्रमाणात मालमत्ता आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये रोकड, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, शस्त्रसामग्री आणि इतर पुरावे समाविष्ट आहेत. 17 मार्च रोजी आरोपीला अटक करण्यात आली असून त्यानंतर तपास अधिक वेगाने सुरू आहे.
तसेच आरोपीच्या नावावर आणि नातेवाईकांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची चौकशी सुरू असून आतापर्यंत सुमारे 40 कोटी रुपयांची संपत्ती समोर आली आहे. यामध्ये जमीन, फ्लॅट, फार्महाऊस आणि इतर मालमत्ता यांचा समावेश आहे.
सरकारने स्पष्ट केलं आहे की या प्रकरणात आरोपीला मदत करणाऱ्यांनाही वाचवले जाणार नाही. तपास पुढे जात असताना आणखी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.