मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात बंगळुरू (कर्नाटक) पोलिसांनी 'झीरो एफआयआर' दाखल केला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. हा केवळ अपघात नसून एक "मोठा गुन्हेगारी कट"असल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्रात तक्रार नोंदवली जात नसल्यामुळे, रोहित पवारांनी बंगळुरू पोलिसांकडे ही तक्रार नोंदवली, जी आता तपासासाठी बारामती ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्रात FIR दाखल होऊन त्यांना न्याय मिळू शकला नसला तरी 23 मार्चला कर्नाटकमधील पोलीस ठाण्यात झिरो नंबरने FIR दाखल करुन तो महाराष्ट्र पोलिसांकडं वर्ग करण्यात आला. याबाबत कर्नाटक पोलिसांचे आभार. आता महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी वाढली असून या FIR चा तपास कशा पद्धतीने होतो, याकडं आम्ही बारकाईने लक्ष ठेवू, असं रोहित पवार म्हणाले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात नवीन वळण आले आहे. कर्नाटकातील बंगळुरू येथे पोलिसांनी ‘झिरो FIR’ नोंदवली असून, ही तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. या तक्रारीत अपघातामागे केवळ तांत्रिक बिघाड नसून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात तक्रार नोंदवली जात नसल्याने कर्नाटकात FIR दाखल केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. 23 मार्च रोजी नोंदवलेली ही झिरो FIR पुढील तपासासाठी बारामती ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास कसा होतो, याकडे लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

FIR मधील मुख्य आरोप काय?
नोंदवलेल्या FIR मध्ये भारतीय न्याय संहितेअंतर्गत अनेक गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये खून, निष्काळजीपणामुळे मृत्यू, कटकारस्थान, पुरावे नष्ट करणे आणि बनावट कागदपत्र तयार करणे यांसारख्या आरोपांचा उल्लेख आहे.
तक्रारीत विमान सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. विशेषतः कमी दृश्यता असताना लँडिंगची परवानगी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय विमानाच्या वापराच्या तासांमध्ये विसंगती, शेवटच्या क्षणी पायलट बदलणे, तसेच संबंधित पायलटच्या पूर्वीच्या शिस्तभंगाच्या नोंदी यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
या सर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर हा अपघात साधा नसून संभाव्य गैरव्यवहार आणि निष्काळजीपणाचा परिणाम असू शकतो, असा दावा तक्रारीत करण्यात आला असून सखोल गुन्हेगारी तपासाची मागणी करण्यात आली आहे.
झिरो FIR म्हणजे काय?
झिरो FIR म्हणजे गुन्हा कोणत्याही ठिकाणी घडला असला तरी तो कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंदवता येतो. सुरुवातीला त्याला ‘0’ क्रमांक दिला जातो आणि नंतर तो संबंधित क्षेत्रातील पोलीस ठाण्याकडे तपासासाठी वर्ग केला जातो. या प्रक्रियेमुळे तक्रार दाखल करण्यात विलंब होत नाही आणि तपास तातडीने सुरू करता येतो.
