वसई : अध्यात्माच्या नावाखाली महिलेला फसवून अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात आरोपी ऋषिकेश वैद्य याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याची दोन आणि माणिकपूर पोलिसांची दोन अशी एकूण चार पथकं सध्या वसई-विरार परिसरात आरोपीच्या शोधात आहेत. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात कारवाईत झालेल्या कथित विलंबामुळे आरोपी पसार झाल्याची चर्चा रंगत आहे.
पीडित महिलेने बुधवारी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर येथे गुन्हा दाखल करून ‘झिरो एफआयआर’द्वारे प्रकरण पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. दरम्यान, वेळेत अटक न झाल्याने आरोपीला पळून जाण्याची संधी मिळाल्याचा आरोप केला जात आहे.
आरोपीचा ‘खोटा गुन्हा’ असल्याचा दावा
या प्रकरणात आरोपी ऋषिकेश वैद्य याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, “माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला असून सत्य लवकरच समोर येईल,” असा दावा केला आहे. त्यामुळे एका बाजूला पीडितेचे गंभीर आरोप आणि दुसऱ्या बाजूला आरोपीचा बचाव यामुळे प्रकरण अधिक चर्चेत आले आहे.
सोशल मीडियातून ओळख, विश्वास संपादन करून गैरकृत्य
तक्रारीनुसार, आरोपीने २०२३ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेची ओळख करून घेतली. स्वतःला ‘शंकराचा अवतार’ असल्याचे सांगत आणि महिलेला ‘तू माझी पार्वती आहेस’ असे सांगून तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर पुण्यात भेटीत गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच वसईतही पुन्हा गैरकृत्य केल्याचे महिलेने नमूद केले आहे.
ब्लॅकमेलिंगचा आरोप
अत्याचारानंतर आरोपीने महिलेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढून त्याद्वारे तिला धमकावत राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. २०२५ पर्यंत हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांवर प्रश्नचिन्ह
प्रकरण उघडकीस आल्यानंतर तातडीने कारवाई झाली असती, तर आरोपीला अटक होऊ शकली असती, असे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.सध्या आरोपी फरार असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास अधिक सखोलपणे करण्यात येत असून सर्व पुरावे आणि दोन्ही बाजूंचे दावे तपासले जाणार आहेत.