वसई : लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांना सामोरे जात असलेला ऋषिकेश वैद्य सध्या फरार असून, त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत स्वतःवरील सर्व आरोप नाकारले आहेत. “माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला आहे. लवकरच सत्य समोर येईल. सत्यमेव जयते,” असा दावा त्याने फेसबुक आणि व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून केला आहे.
या प्रकरणात पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच त्याची ही पोस्ट समोर आल्यामुळे तपासाला नवे वळण मिळाले आहे. एका बाजूला पीडित महिलेचे गंभीर आरोप आणि दुसऱ्या बाजूला आरोपीचा बचाव, यामुळे नेमके सत्य काय, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
माणिकपूर पोलिस ठाण्यात ‘झिरो नंबर’ने गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी त्याच्या वसईतील घरावर धाड टाकली होती. मात्र, तो तेथे आढळून आला नाही. त्यानंतर तो फरार असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा पुढील तपास पुण्यातील मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, पुणे पोलिसांचे पथकही त्याच्या शोधासाठी सक्रिय झाले आहे.
झिरो नंबर गुन्ह्यानंतरही आरोपी फरार
बुधवारी रात्री गुन्हा नोंदवल्यानंतर तत्काळ कारवाई अपेक्षित असतानाही आरोपी हाती लागला नाही. त्यामुळे त्याला पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ मिळाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धर्माच्या नावाखाली विश्वास संपादन केल्याचा आरोप
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, २०२३ मध्ये सोशल मीडियावरून ओळख वाढवत आरोपीने स्वतःला ‘शंकराचा अवतार’ म्हणून सादर केले. “तू माझी पार्वती आहेस,” असे सांगत त्याने तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर पुण्यातील एका लॉजमध्ये नेऊन गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याचा आरोप आहे.तसेच, वसईतही तिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओच्या आधारे २०२५ पर्यंत ब्लॅकमेल केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या संपूर्ण प्रकरणात धर्म आणि अध्यात्माचा वापर करून महिलांची फसवणूक केल्याचा आरोप गंभीर मानला जात असून, पोलिस सर्व पुरावे तपासत आहेत. आरोपी अद्याप फरार असल्याने त्याला पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.