मुंबई : एकात्मिक (Integrated) आरोग्यसेवा हीच भविष्यातील दिशा आहे. वैद्यकीय शिक्षणात मानसिक, सामाजिक आणि तांत्रिक घटकांचा समन्वय साधून रुग्ण-केंद्रित सेवा अधिक प्रभावी बनवण्यावर भर देण्यात यावा असे मत तज्ञांनी व्यक्त केले.बीकेसीतील जिओ कनव्हेंशन सेंटर येथे आयोजित ‘पल्स परिषदेतील “The Future is Integrated Care – Strengthening Medical Education for Comprehensive, Patient-Centred Practice” या विषयावर आयोजित चर्चासत्रात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी आरोग्यसेवेतील एकात्मिक दृष्टिकोनाची गरज अधोरेखित केली. यावेळी वैद्यकीय शिक्षण, मानसिक आरोग्य, आणि रुग्ण-केंद्रित सेवा यावर महत्त्वपूर्ण विचार मांडण्यात आले.यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह इतर मान्यवर,तज्ञ, उपस्थित होते.
बकुल दुआ (क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट व सायकोथेरपिस्ट) यांनी मानसिक आरोग्य हा एकात्मिक आरोग्यसेवेचा केंद्रबिंदू असल्याचे सांगितले. वैद्यकीय शिक्षणामध्ये सायकोलॉजिकल केअरचा समावेश अनिवार्य असून, डॉक्टरांनी रुग्णांच्या मानसिक स्थितीची जाण ठेवणे अत्यावश्यक असल्यावर त्यांनी भर दिला. आजच्या काळात तणाव, नैराश्य यांसारख्या समस्या वाढत असल्याने रुग्ण-केंद्रित उपचारपद्धतीत मानसिक आधार महत्त्वाचा घटक ठरतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. चारुदत्त आपटे (न्यूरोसर्जन, लोकमान्य हॉस्पिटल्स) यांनी आधुनिक वैद्यकीय शिक्षणात तांत्रिक कौशल्यांसोबतच बहुविषयक (multidisciplinary) दृष्टिकोनाची गरज मांडली. विविध तज्ज्ञांच्या समन्वयातूनच रुग्णांना प्रभावी आणि सर्वंकष उपचार मिळू शकतात, असे ते म्हणाले. आरोग्य व्यवस्थेत समन्वय वाढवून उपचाराची गुणवत्ता सुधारण्यावर त्यांनी भर दिला.
डॉ. सुषमा नगरकर (सायकोलॉजिस्ट, यश चॅरिटेबल ट्रस्ट) यांनी सामाजिक आणि मानसिक आरोग्य यांचा परस्पर संबंध स्पष्ट केला. रुग्णांच्या उपचारात त्यांच्या सामाजिक परिस्थिती, कुटुंबाचा आधार आणि मानसिक स्वास्थ्य यांचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. एकात्मिक आरोग्यसेवा ही केवळ वैद्यकीय उपचारांपुरती मर्यादित नसून, ती समाजाशी निगडित असल्याचे त्यांनी नमूद केले.
अभिनेता आमिर खान (अॅडव्हायजरी बोर्ड, अगत्सु फाउंडेशन) यांनी आरोग्य व्यवस्थेत मानवी संवेदनशीलता आणि विश्वास यांचे महत्त्व अधोरेखित केले. डॉक्टर-रुग्ण नातेसंबंध अधिक सुदृढ करण्यासाठी संवाद कौशल्य आणि सहानुभूती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आरोग्यसेवेतील सुधारणा घडवण्यासाठी शिक्षण आणि समाजजागृती यांची भूमिका महत्त्वाची असल्यावर त्यांनी भर दिला. आरोग्यसेवा ही केवळ उपचारांची यंत्रणा नसून ती मानवी नातेसंबंधांवर आधारलेली व्यवस्था असल्याचे स्पष्ट करत श्री खान म्हणाले की रुग्ण जेव्हा डॉक्टरांकडे येतो, तेव्हा तो केवळ आजार घेऊन येत नाही, तर भीती, असुरक्षितता आणि अनेक प्रश्नही घेऊन येतो. अशा वेळी डॉक्टरांनी केवळ औषधोपचार न करता सहानुभूतीने संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या अत्याधुनिक वैद्यकीय युगात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरले जात असले, तरी “ह्यूमन टच” (मानवी स्पर्श) हा घटक कमी होत चालला आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षणातच संवादकौशल्य (communication skills), समजूतदारपणा आणि भावनिक बुद्धिमत्ता (emotional intelligence) यांचा समावेश करणे आवश्यक आहे. “रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात विश्वास निर्माण झाला, तर उपचारांची परिणामकारकता आपोआप वाढते,” असे त्यांनी सांगितले. अनेकदा रुग्णांना त्यांच्या आजाराबद्दल पुरेशी माहिती दिली जात नाही, त्यामुळे भीती आणि गैरसमज वाढतात. डॉक्टरांनी रुग्णांशी स्पष्ट, सोप्या भाषेत संवाद साधल्यास हा दुरावा कमी होऊ शकतो, असे ते म्हणाले.
यासोबतच त्यांनी समाजजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. आरोग्यसेवा ही केवळ हॉस्पिटलपुरती मर्यादित न राहता समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचली पाहिजे. लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे आणि मानसिक आरोग्याविषयी खुली चर्चा घडवून आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातील डॉक्टर हे केवळ तज्ज्ञ नसून संवेदनशील मार्गदर्शक (empathetic caregivers) असायला हवेत. “आपण कितीही प्रगत तंत्रज्ञान वापरले, तरी शेवटी रुग्णाला बरे करणारा घटक म्हणजे डॉक्टरांचा विश्वास, सहानुभूती आणि समजूतदारपणा,” असे त्यांनी सांगितले.