सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'या आम्ही वाट पाहतोय'! ट्रम्पकडून संभाव्य भू-आक्रमणाची चर्चा सुरू असतानाच इराणचा 'दहा लाख' सैनिकांचा हुंकार; अमेरिकेला व्हिएतनाम किंवा अफगाणिस्तानपेक्षाही भीषण दलदलीत अडकवण्याची तयारी
  • दारूमुळे गावाचा समतोल बिघडला; दुकान बंद करण्यासाठी महिलांचा एल्गार, लग्नांवरही परिणाम
  • भोंदू अशोक खरातांकडे जाणारे 'ते' 40 आमदार कोण? तो कोणाला भेटायला दिल्लीला जायचा? विमानाची व्यवस्था कोणी केली, सगळं बाहेर आलं पाहिजे, राऊतांची मागणी
 शहर

खाकी वर्दीचं स्वप्न अपूर्णच; पुण्यात पोलीस भरतीदरम्यान धावताना २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

डिजिटल पुणे    28-03-2026 15:32:52

पुणे: महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका तरुणाचा भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीदरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली आहे. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शनिवारी सकाळी ही घटना घडली असून, पुरुषोत्तम बारकुल (वय २३, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस भरतीची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू असून, उमेदवारांची शारीरिक क्षमता तपासण्यासाठी १६०० मीटर धावण्याची चाचणी घेतली जात होती. पुरुषोत्तम बारकुल हाही या चाचणीत सहभागी झाला होता. सुरुवातीच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्यानंतर तिसऱ्या फेरीत धावत असताना त्याला अचानक अपस्माराचा झटका आला आणि तो मैदानावर कोसळला.

घटनेनंतर उपस्थित अधिकारी व इतर उमेदवारांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. वैद्यकीय पथकाने प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याला तातडीने ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

पुरुषोत्तम हा साध्या कुटुंबातील असून, पोलीस होण्याच्या ध्येयाने त्याने कठोर परिश्रम घेतले होते. रोजच्या सरावातून त्याने स्वतःला या चाचणीसाठी तयार केले होते. मात्र, नियतीने त्याचे स्वप्न अधुरेच ठेवले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, भरती प्रक्रियेच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


 Give Feedback



 जाहिराती