पुणे : वाकड येथील वेदांता सोसायटीने पर्यावरणपूरक उपक्रमांत महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘हरित अभियान’ मोहिमेअंतर्गत ७० किलोवॅट क्षमतेचा रूफटॉप सौरऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. सुमारे ₹३५ लाख खर्चून अवघ्या तीन महिन्यांत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.या प्रकल्पाचे उद्घाटन शनिवारी मा. आमदार श्री. शंकर भाऊ जगतापयांच्या हस्ते पार पडले. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका नगरसेविका सौ. स्नेहाताई कलाटे, सौ. श्रुतीताई वाकडकर, सौ. रेश्माताई भुजबळ, तसेच नगरसेवक श्री. कुणाल वाव्हळकर आणि सोसायटीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविक भाषणात अध्यक्ष डॉ. सोमनाथ धोंडे यांनी सांगितले की, विशेष म्हणजे हा सौरऊर्जा प्रकल्प रहिवाशांकडून कोणताही अतिरिक्त निधी न उभारता, सोसायटीच्या बचतीतून व केंद्र शासनाच्या अनुदानाच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे सामायिक वापराच्या महावितरण (MSEB) वीज बिलात सुमारे ६० टक्क्यांपर्यंत बचत होणार असून, रहिवाशांच्या सहकार्याने लवकरच अतिरिक्त ६० किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्पही उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्घाटनप्रसंगी आमदार श्री. शंकर भाऊ जगताप यांनी वेदांता सोसायटीच्या या उपक्रमाचे कौतुक करत, हा प्रकल्प शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी एक स्तुत्य पाऊल असल्याचे मत व्यक्त केले. तसेच, अशा प्रकल्पांमुळे वीज खर्चात बचत होण्याबरोबरच स्वच्छ व नवीकरणीय ऊर्जेच्या वापराला चालना मिळून देशाच्या आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाला हातभार लागतो, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्ष डॉ. सोमनाथ धोंडे यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीने यापूर्वीही अनेक पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत. सोसायटीमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यरत असून, २०२० साली एसटीपी मीटरचे ग्रीन मीटरमध्ये रूपांतर करण्यात आले होते, ज्यामुळे वीज खर्चात मोठी बचत झाली आहे.

याशिवाय, सोसायटीमध्ये पावसाचे पाणी साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) तसेच ओल्या कचऱ्याचे अंशतः प्रक्रिया व्यवस्थापन सुरू असून, लवकरच संपूर्ण कचरा प्रक्रिया प्रकल्प राबवण्याचा मानस आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.हा सौरऊर्जा प्रकल्प श्री. सुमंत देशपांडे यांच्या पुढाकारातून साकार झाला असून, सचिव स्नेहा राव, खजिनदार प्रमोद भोसले तसेच समिती सदस्य निखिल मुळे, मयूर वाघमारे, पराग रुद्रवार, भूषण बाविस्कर, गौरव मानकर, मदन पाटील आणि निती पाठक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.वेदांता सोसायटीने नेहमीच हरित व पर्यावरणपूरक कॅम्पस जपण्यावर भर दिला असून, हा उपक्रम इतर नागरी सोसायट्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
