उरण : अशोक खरात या नाशिक मधील स्वयंघोषीत भोंदू बाबाचे नवनवीन कारनामे उघडकीला येत आहेत आणि ते अत्यंत अस्वस्थ करणारे आहेत. अस्थिर आणि बेभरवशाची कारकीर्द, त्यातून सतत असलेली असुरक्षिततेची भावना यामुळे अशा बाबाबुवांच्या नादी लागणारे मोठमोठे राजकीय पुढारी, मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी आणि भविष्य चाचपडणा-या उच्चभ्रू व अन्याय अत्याचार झालेल्या महिला यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक आयुष्य उध्वस्त करणा-या विकृत अशोक खरातला कठोर शासन झालेच पाहिजे.
या अशोक खरातनी निर्माण केलेल्या मंदिर व ट्रस्टच्या नावाखाली १०५ कोटी रुपयांचा निधी शासनाचे विविध विभागाने वळविला आहे. सोबतच ४८ कि.मी. लांबीची स्वतंत्र जलवाहिनी व एक लाख क्षमता असलेली पाण्याची टाकी बनवून दिली आहे. सुमारे ३०० हून अधिक व्हिडीओ काल परवापर्यत पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आले आहेत. अशा या विकृत नराधमाला व त्याला सहाय्य करणा-या मंत्री, शासकीय अधिकारी व स्थानिक स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी होऊन त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत.अशी मागणी करत उरण शहरातील बाझारपेठेत असलेल्या महात्मा गांधी चौक येथे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने निदर्शने केले. निदर्शन करून त्यांनी या नराधमाचा जाहीर निषेध केला आहे.
आपल्या देशात आणि राज्यात वैज्ञानिक दृष्टीकोन, संवैधानिक मुल्ये आणि सामाजिक न्यायाच्या मुल्यांना मुठमाती देवून धर्मांधता आणि त्यातून येणारे अज्ञान, बुवाबाजी आणि अंधभक्ती हि मोठ्या प्रमाणावर वाढीला लागली आहे हे समाजाचे अपयश तर आहेच पण सत्ता मिळविण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत चुकीच्या मुल्यांना खतपाणी घालणा-या सत्ताधा-यांच्या वृत्तीचे हे फलित आहे. त्यामुळे या प्रकरणात जर आरोपींना वाचविण्याचे, चौकशीत त्रुटी ठेवण्याचे, दिरंगाई करण्याचे प्रयत्न आढळून आले तर अ.भा. जनवादी महिला संघटना सर्व समविचारी शक्तींना सोबत घेवून तिव्र आंदोलन उभे करेल असा इशारा संघटनेने या निवेदनामार्फत दिला आहे.
सदर संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील,धनवंती भगत, सविता पाटील, लता पाटील, उषाताई म्हात्रे, कुसुम ठाकूर, शारदा ठाकूर, कुंदा पाटील, प्रणाली पाटील, गुलाब टावरी,मुमताज भाटिया,निराताई घरत,उरण पंचायत समिती सदस्य कविता म्हात्रे,ललिता पाटील, रजनी पाटील,अपर्णा म्हात्रे यांच्यासह कामगार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड भूषण पाटील, कॉम्रेड संजय ठाकूर, कॉम्रेड संतोष ठाकूर,किसान सभेचे पद्माकर पाटील तसेच इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
मागण्या :-
१) या संपूर्ण प्रकरणाची सखोल, उच्चस्तरीय, स्वतंत्र व कालबध्द चौकशी करुन यातील सर्व दोषींना कठोरातील कठोर शिक्षा करावी.
२) विकृत अशोक खरात याच्याशी संबंधीत सर्व मालमत्ता सरकारने ताब्यात घ्यावी.
३) पिडीत नागरीकांना न्याय आणि आर्थिक भरपाई देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी.
४) या प्रकरणात बळी पडलेल्या महिलांना अभय देवून त्यांना बोलते करावे व त्यांचे योग्य असे समुपदेशनाची व्यवस्था करावी.
५) या प्रकरणात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या प्रत्येक राजकीय, प्रशासकीय व सामाजिक पुढा-यांची सर्व स्तरावरील नावे जाहीर करुन त्यांच्यावर सुध्दा कठोर कारवाई करावी.
६) सर्व सबंधितांवर लैंगिक, आर्थिक शोषण व फसवणूक तसेच अंधश्रध्दा निर्मूलन अशा सर्व कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी.