सातारा: सातारा जिल्ह्यातील तासवडे एमआयडीसी परिसरात एका केमिकल कारखान्यात जोरदार स्फोट झाल्याची गंभीर घटना घडली आहे. स्फोट इतका तीव्र होता की सुमारे दहा किलोमीटरपर्यंत त्याचे धक्के जाणवले. परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्याची माहिती समोर आली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, स्फोटानंतर कारखान्यात भीषण आग लागली. आगीच्या ज्वाला उंच उसळताना दिसत असून काळ्या धुराचे मोठे ढग आकाशात पसरले आहेत. स्फोटाचा आवाज ऐकून नागरिक घराबाहेर धावले. काहींना भूकंप झाल्याचा भासही झाला होता.घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
अद्याप कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचं मोठं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याने आगीने अधिक पेट धरला. सध्या हे केमिकल नेमकं कोणतं, स्फोट होण्यामागील नेमकं कारण काय? या सगळ्याचा पोलीस तपास करत आहे. स्फोटानंतर आगीनं रौद्रधारण केलं. त्यांनतर परिसरात आगीच्या ज्वाला आणि काळ्या धुराचे लोट आकाशात दिसत होते. हा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घराबाहेर धावले. सुरुवातीला भूकंपाचा धक्का बसला की काय, अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली होती. अशातच आता तपासाअंती या अपघाताचे कारण समजू शकणार आहे.
कारखान्यात साठवलेल्या रसायनांमुळे आग अधिक भडकली असल्याचे सांगितले जात आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला आणि कोणत्या रसायनांमुळे ही दुर्घटना घडली, याचा तपास संबंधित यंत्रणा करत आहेत.