बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हायव्होल्टेज वीजतारा चोरी करण्याच्या प्रयत्नात टॉवर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर उरलेल्या साथीदारांनी अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस तपासात सत्य बाहेर आले.
घटना नेमकी काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पाच जणांची टोळी केज तालुक्यातील नांदूर घाट परिसरात वीजतारा चोरण्यासाठी आली होती. शनिवारी रात्री त्यांनी हायव्होल्टेज टॉवरवर चढून तारा कापण्यास सुरुवात केली. मात्र, अचानक टॉवर कोसळल्याने अविनाश पाटोळे आणि आकाश आडे या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताचा बनाव फसला
घटनेनंतर घाबरलेल्या इतर तिघांनी मृत्यूला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मृतदेह कारमधून परभणी येथे नेले आणि तिथेच सोडून पळ काढला. दरम्यान, रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर संशय निर्माण झाला आणि नातेवाईकांनी चौकशी केल्यावर संपूर्ण प्रकार उघड झाला.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच केज आणि परभणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. टॉवर कोसळण्यामागील नेमके कारण, तसेच या टोळीचे अन्य ठिकाणी संबंध आहेत का, याचा तपास सुरू आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.