मुंबई : स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, या प्रकरणात आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावरही चौकशीची छाया गडद होत आहे. खरातसोबतच्या संबंधांमुळे आधीच दोन महत्त्वाच्या पदांचा राजीनामा द्यावा लागलेल्या चाकणकरांना आता चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, खरातशी संबंधित ‘शिवनिका’ संस्थेच्या व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) संस्थेच्या आजी-माजी विश्वस्तांना समन्स पाठवले आहेत. यामध्ये रुपाली चाकणकर यांचाही समावेश असून, आज त्यांच्या चौकशीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी संयत प्रतिक्रिया दिली. “या प्रकरणाबाबत माझ्याकडे सध्या तपशीलवार माहिती नाही. तपास यंत्रणा निष्पक्षपणे काम करत आहे. आवश्यक तेव्हाच माहिती दिली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अशोक खरातच्या अघोरी कृत्यांबरोबरच आर्थिक गैरव्यवहारांचाही तपास सुरू असून, या प्रकरणात अनेक नवीन धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. वाढत्या तक्रारी आणि समोर येणाऱ्या पीडित महिलांमुळे तपास अधिकच गंभीर बनला आहे.
दरम्यान, न्यायालयाने अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करत त्याला १ एप्रिलपर्यंत पोलिसांच्या ताब्यात ठेवण्याचा आदेश दिला आहे. या कालावधीत तपास यंत्रणेला आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.