पुणे : राज्यात सध्या हवामानाचा पूर्णपणे बदललेला चेहरा पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) च्या अंदाजानुसार विविध भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटही होत आहे.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच विदर्भातील वाशिम जिल्ह्यात दुपारनंतर अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. काही काळासाठी उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी या पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण, मेघगर्जना आणि वाऱ्यांचा जोर वाढलेला दिसत आहे. काही ठिकाणी गारपीटही झाल्याने “उन्हाळा की पावसाळा?” असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेत आहे. या अनियमित पावसामुळे सखल भागात पाणी साचून वाहतुकीवर परिणाम होत आहे.
शेतकऱ्यांसमोर नवीन संकट
नंदूरबार, बीड, वाशिम या जिल्ह्यांत गारपीट आणि अवकाळी पावसामुळे काढणीस तयार असलेल्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. आंबा बाग, भाजीपाला आणि कांदा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडले आहेत.
बीड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची रिपरिप सुरू असून, गेवराई, पाटोदा आणि वडवणी परिसरातही पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतीचे नुकसान टाळण्याची चिंता कायम आहे.
पुणे-पिंपरीत जोरदार सरी
पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी बाणेर, शिवाजीनगर, हडपसर, पुणे स्टेशन आणि लोणी काळभोर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. काही सखल भागात पाणी साचल्याचे चित्र दिसले. पिंपरी-चिंचवडमध्येही अर्धा तास मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
पुढील काही दिवसांचा अंदाज
हवामान विभागानुसार 30 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान राज्यातील हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मेघगर्जनेसह पाऊस, ताशी 30 ते 50 किमी वेगाने वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे.विशेष म्हणजे, 1 एप्रिलपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.