बीड : बीड तालुक्यातील मांजरसुंबा परिसरात प्रेमसंबंधांच्या वादातून एका 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे (वय 23) असे मृत तरुणाचे नाव असून, प्रेयसीच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीमुळे आणि मानसिक छळामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
बीड तालुक्यातील मांजरसुंबा परिसरात प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या वादाचा दुर्दैवी शेवट झाला आहे. 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, त्यामागे मारहाण व मानसिक छळ कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
मृत तरुणाचे नाव ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे (वय 23) असे आहे. तो नेकनूरजवळील एका गावातील तरुणीसोबत संबंधात होता. या नात्याची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त करत ज्ञानेश्वरला बोलावून घेतल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्याच्याकडील मोबाईल व दुचाकी काढून घेत काही जणांनी त्याच्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच त्याच्यावर चोरीचा आरोप करत गावात बदनामी करण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे.
या घटनेनंतर ज्ञानेश्वर तणावाखाली होता. त्याने एक चिठ्ठी लिहून त्याच्यावर झालेल्या मारहाणीचा व धमक्यांचा उल्लेख केल्याचे समजते. त्यानंतर धुळे–सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका टायर पंक्चर दुकानाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृताच्या आईने गंभीर आरोप करत म्हटले आहे की, “माझ्या मुलाला बोलावून झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. त्याचे व्हिडिओही काढण्यात आले. संबंधितांवर कडक कारवाई व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत उंदरे, सचिन उंदरे, अशोक उंदरे आणि प्रेम उंदरे अशी आरोपींची नावे असून, त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.