सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा कहर; गारपीट-वादळी पावसाने शेती उद्ध्वस्त, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
  • अशोक खरातच्या लेकीची लग्नपत्रिका, एकनाथ शिंदे, चाकणकर, मिलिंद नार्वेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलारांचं नाव!
 विश्लेषण

राज्यात अवकाळीचा कहर; गारपीट-वादळी पावसाने शेती उद्ध्वस्त, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

डिजिटल पुणे    31-03-2026 12:00:33

पुणे : राज्यात गेल्या २४ तासांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट पाहायला मिळत आहे. या बदलत्या हवामानामुळे मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भ ते दक्षिण भारत दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील चार दिवसही अशाच प्रकारचे वातावरण कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. विजांसह मेघगर्जना आणि तुरळक गारपीट होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मका, ज्वारी, बाजरी, कांदा बियाणे तसेच काढणीसाठी तयार असलेल्या गहू आणि हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भुसावळ, एरंडोल, धरणगाव आणि मुक्ताईनगर परिसरात वादळी पावसाचा विशेष फटका बसला आहे.

नांदेड जिल्ह्यातही परिस्थिती गंभीर असून गहू, मका, ज्वारी, आंबा आणि हळद पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीज कोसळून जनावरांचेही बळी गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

आज नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर उर्वरित भागांत यलो अलर्ट देण्यात आला आहे.सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.


 Give Feedback



 जाहिराती