पुणे: पुणे शहर वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबवत ट्रिपल सीट, मॉडिफाईड सायलेंसर आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणांवर कडक कारवाई केली. 27 मार्च ते 29 मार्च 2026 दरम्यान चाललेल्या या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर दंड वसूल करण्यात आला असून अनेक वाहने जप्त करण्यात आली आहेत.


या कारवाईत ट्रिपल सीट चालवणाऱ्या 1,259 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. तसेच मॉडिफाईड सायलेंसर वापरणाऱ्या 320 वाहनांवरही कारवाई करत सर्व सायलेंसर जप्त करण्यात आले. या दोन्ही प्रकारांत एकूण 5,87,000 रुपयांचा दंड शासनाकडे जमा करण्यात आला. कारवाईदरम्यान 234 मॉडिफाईड सायलेंसर आणि 685 वाहने जप्त करण्यात आली आहेत.

याशिवाय इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवरही पोलिसांनी कारवाई केली असून तीन दिवसांत एकूण 45,96,200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.ड्रिंक अँड ड्राईव्हविरोधातही विशेष मोहीम राबवण्यात आली. शहरातील 30 ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली असून 258 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, मॉडिफाईड सायलेंसरमुळे ध्वनीप्रदूषण वाढते आणि नागरिकांना त्रास होतो. तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवणे हे जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे.पुढील काळातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
