मुंबई: राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी दुरुस्तीसाठी महिलांना दिलासा देत मुदत वाढवण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. यापूर्वी 31 मार्चपर्यंत असलेली अंतिम मुदत आता 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.
ही मुदतवाढ देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. तसेच, ई-केवायसी दुरुस्तीसाठी ही महिलांना दिलेली अंतिम संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्य सरकारने जुलै 2024 पासून सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे लाभार्थींनी वेळेत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया
भोंदू अशोक खरात प्रकरणावर बोलताना आदिती तटकरे यांनी टीकेबद्दल नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात सुरुवातीपासूनच आपण भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली असून, पीडित महिलांना न्याय मिळवून देणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
विलिनीकरणाच्या चर्चांवर स्पष्टीकरण
विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना तटकरे यांनी काही गैरसमज निर्माण झाल्याचे सांगितले. वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या चर्चा झाल्यामुळे संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चेनंतरच भूमिका ठरवली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.