उरण : विष्णुदास भावे नाट्यगृह सभागृह वाशी नवी मुंबई येथे सारथी सेवा संस्था द्वारे सेंट मेरीज जे. एन. पी. शाळेचे शिक्षक हरीश धर्मा भोंडकर यांना महारक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार हा रस्ता सुरक्षा अभियान, गणपती विसर्जन व इलेक्शन ड्युटी साठी विशेष पोलीस अधिकारी म्हणून ड्युटी केल्याबद्दल, अपघातग्रस्तांना मदत केल्याबद्दल, दरवर्षी रक्तदान केल्याबद्दल, शालेय विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्च पास्ट संचलनाबरोबरच वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण दल याबद्दल माहिती दिल्याबद्दल देण्यात आला. या विशिष्ट पुरस्काराबद्दल त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक राजेश अल्फोंस यांनी देखील कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. समाजसेवेचे कार्य करत असताना त्यांना जी प्रेरणा मिळाली ती त्यांचे गुरुवर्य विलास पाटील यांच्याकडून.विलास पाटील हे त्यांचे आदर्श आहेत.समाजाची कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सेवा करण्याचा हरीश धर्मा भोंडकर नेहमी प्रयत्न करत असतात व इतरांनाही प्रेरित करतात.त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अनेक ठिकाणी त्यांचा मानसन्मान सुद्धा झाला आहे.शिक्षक हरीश धर्मा भोंडकर यांना महारक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.