पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने दि.३ व ४ एप्रिल रोजी “इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रिस्पॉन्सिबल, रिस्क अवेअर अँड रेग्युलेटेड एआय (RRRAI-2026)” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन ३ एप्रिल रोजी पुणे येथे जेआयएस विद्यापीठाचे प्रो-चॅन्सलर व एआयसीटीईचे माजी सल्लागार डॉ. नीरज सक्सेना यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून टेक्नो इंटरनॅशनल न्यू टाउन येथील डॉ. नीलांजन डे, भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जगताप, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, सौ. स्वप्नाली कदम, डॉ. एम. एस. सागरे, प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद, उपप्राचार्य डॉ. सुनीता जाधव, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. के. बी. सुतार तसेच विविध पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी व सहभागी उपस्थित होते.
या दोन दिवसीय परिषदेत जगभरातील प्रमुख दहा वक्ते सहभागी झाले असून, कृत्रिम बुद्धिमत्तेतील अत्याधुनिक प्रगती, आव्हाने आणि नियामक चौकटींबाबत सखोल चर्चा करत आहेत. डॉ. सुनीता जाधव यांनी प्रास्ताविक केले .डॉ. के. बी. सुतार आणि डॉ. डी. जी. कुंभार यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रियांका पायगुडे आणि डॉ. हर्षदा मेहत्रे यांनी केले.
या परिषदेस देश-विदेशातील संशोधकांकडून ८०० हून अधिक उच्च दर्जाच्या संशोधन लेख प्राप्त झाले असून, त्यापैकी एकूण
३६८ निवडक संशोधन लेख Atlantis Press, Wiley आणि Taylor & Francis यांसारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये प्रकाशित होणार आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षण आणि समाजात मोठे परिवर्तन
“शिक्षणाचे भविष्य केवळ उत्तरांमध्ये नसून चिकित्सक विचारक्षमतेमध्ये आहे,” असे प्रतिपादन जेआयएस विद्यापीठाचे प्रो-चॅन्सलर व एआयसीटीईचे माजी सल्लागार डॉ. नीरज सक्सेना यांनी केले. भारती विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे आयोजित ‘रिस्पॉन्सिबल, रिस्क-अवेयर अँड रेग्युलेटेड एआय (आरआरआरएआय-२०२६)’ या आंतरराष्ट्रीय परिषद आणि एआयसीटीई-आयडिया लॅबच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
डॉ. सक्सेना यांनी पुढे सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षण आणि समाजात मोठे परिवर्तन होत असून पारंपरिक अभ्यासक्रम, वर्गखोल्या आणि परीक्षा यांचे महत्त्व कमी होत आहे. याऐवजी कौशल्य, चिकित्सक विचार आणि समस्या सोडविण्याची क्षमता यांवर भर देणे आवश्यक आहे.डॉ. अस्मिता जगताप यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैतिकतेवर भर देत सांगितले की, “नीतीशून्य बुद्धिमत्ता धोकादायक ठरते, दिशेविना वेग जोखमीचा असतो आणि जबाबदारीशिवाय नवकल्पना घातक ठरू शकते.” त्यांनी विशेषतः आरोग्य, शिक्षण आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात मानवी संवेदनशीलता आणि जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले.
डॉ. नीलांजन डे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावावर प्रकाश टाकत ‘डार्क डेटा’च्या जोखमींबाबत इशारा दिला. चुकीच्या माहितीमुळे चुकीचे निष्कर्ष निघू शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी जबाबदारीने आणि नियमनबद्ध पद्धतीने एआयचा वापर करण्याची गरज व्यक्त केली. अशा परिषदांमुळे ज्ञानविनिमय, नेटवर्किंग आणि व्यावहारिक उपाययोजना शक्य होतात, असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद यांनी संस्थेच्या यशस्वी कामगिरीचा आढावा सादर करत परिषदेत सखोल चर्चा व परिणामकारक निष्कर्ष अपेक्षित असल्याचे सांगितले. डॉ. सुनीता जाधव यांनी प्रास्ताविकात परिषदेत २४ समांतर सत्रांद्वारे ४०३ संशोधन निबंध सादर होणार असल्याची माहिती दिली.