नाशिक : स्वतःला आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातविरोधातील अडचणी वाढताना दिसत आहेत. आधीच विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या खरातवर आता राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, खरात हा दुबई, ऑस्ट्रेलिया तसेच इतर काही देशांमध्ये हवाला मार्गाने मोठ्या प्रमाणावर मनी लाँड्रिंग करत असल्याची माहिती समोर येत आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दावा केला की, खरातने अनेक भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे हजारो कोटी रुपये परदेशात वळवले असावेत. त्यामुळे हे प्रकरण केवळ फसवणुकीपुरते मर्यादित नसून, एक मोठे आर्थिक आणि राजकीय जाळे (नेक्सस) असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी (ED) सारख्या केंद्रीय यंत्रणांकडून व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असू शकतो, त्यामुळे राज्य सरकारनेही राजकारण न करता निष्पक्ष तपास करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अशोक खरातविरोधात आधीच लैंगिक शोषण आणि आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित तब्बल 12 गुन्हे नोंदवले गेले आहेत. अशातच आता नव्याने झालेले हे आरोप त्याच्या अडचणी आणखी वाढवू शकतात. पुढील काळात केंद्रीय तपास यंत्रणा या प्रकरणात हस्तक्षेप करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.