बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक दिवसेंदिवस अधिकच चुरशीची होत चालली आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले असले तरी ते अखेर अपयशी ठरले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून आज त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न झाले. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क साधून पाठिंबा मागण्यात आला होता. मात्र, काँग्रेसने दिल्लीहून आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर करत निवडणूक लढवण्याचा निर्णय स्पष्ट केला.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून भावनिक आवाहन केले आहे. त्यांनी मतदारांना उद्देशून म्हटले की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा असली तरी तसे झाले नाही, तर मतदारांनी ही लढत अजितदादा स्वतः लढवत आहेत असे समजून सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे. “तुमचे एक मत हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या पोटनिवडणुकीत मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 19 जणांनी अर्ज दाखल केले असून आणखी काही उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्याही उमेदवारीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकूण उमेदवारांची संख्या 20 च्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.एकंदरीत, बिनविरोध होण्याची शक्यता मावळल्याने बारामतीतील ही पोटनिवडणूक आता थेट लढतीकडे झुकली असून राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.