सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे रात्रीतून महापुरुषांचा पुतळा उभारल्याच्या घटनेनंतर राज्यभर सुरू असलेल्या अशा प्रकारांना वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपासाची गती वाढवत मुख्य सूत्रधाराचा शोध लावला असून, एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत विनापरवाना पुतळे बसवण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी सामाजिक तणाव निर्माण झाला आहे. अंजनगाव खेलोबा येथे घडलेल्या घटनेनंतर दोन गटांमध्ये वाद वाढला आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली. यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत शेकडो लोकांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले.
तपासादरम्यान जालना जिल्ह्यातील बाळराजे आवारे याचे नाव समोर आले आहे. त्याच्यावर पुतळे बेकायदेशीरपणे उभारणे, समाजात तेढ निर्माण करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, तसेच भडकाऊ वक्तव्ये करण्याचे आरोप आहेत. यापूर्वीही त्याच्यावर विविध ठिकाणी सुमारे 11 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. करमाळा तालुक्यातील एका तत्सम प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे.
दरम्यान, अंजनगावमध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीच्या मोजणीदरम्यान अधिकाऱ्यांशी वाद झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. विनापरवाना पुतळे उभारण्यामागे नेमके कोण आहेत याचा सखोल तपास सुरू असून, अशा कृत्यांमुळे सामाजिक शांतता बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या घटनेनंतर सोलापूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. पुढील काळात अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.