मुंबई: आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलासा देणाऱ्या घडामोडींमुळे आज भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी होत शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला असून बाजारात खरेदीचा जोर दिसून आला.
प्री-ओपनिंग सत्रातच सेन्सेक्सने तब्बल २,५०० ते २,७०० अंकांची उसळी घेतली, तर निफ्टीनेही सुमारे ७५० अंकांनी वाढ नोंदवत वरच्या दिशेने वेगाने वाटचाल केली. आयटी, मेटल आणि रिअॅल्टी क्षेत्रातील समभागांमध्ये विशेष तेजी दिसून आली. तसेच अदानी पोर्ट्स आणि इंडिगो यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही लक्षणीय वाढ झाली.
या तेजीमागे प्रमुख कारण म्हणजे युद्धविरामामुळे निर्माण झालेला जागतिक स्थैर्याचा संकेत. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाल्यानेही बाजाराला आधार मिळाला आहे. ब्रेंट क्रूड आणि वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट या दोन्ही दरांमध्ये सुमारे १३ ते १४ टक्क्यांची घसरण झाली असून दर १०० डॉलरच्या खाली आले आहेत.तज्ज्ञांच्या मते, जागतिक स्तरावर तणाव कमी राहिला आणि शस्त्रसंधी टिकून राहिली, तर भारतीय बाजार पुढील काही दिवसांत आणखी उच्चांक गाठू शकतो.
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांनी दोन आठवड्यांसाठी सैन्य कारवाया थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी या निर्णयाची घोषणा केली, तर इराणकडूनही याला दुजोरा देण्यात आला. दोन्ही देशांमध्ये लवकरच पुढील चर्चेची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.आशियाई बाजारपेठांमध्येही या निर्णयाचे सकारात्मक पडसाद उमटले असून जपान, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांच्या निर्देशांकात चांगली वाढ नोंदवली गेली आहे.