मुंबई: मागील काही दिवसांपासून तणावपूर्ण स्थितीत असलेल्या इराण आणि अमेरिका यांच्यात अखेर तात्पुरती शस्त्रसंधी जाहीर झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील दोन आठवड्यांसाठी कोणतीही लष्करी कारवाई न करण्याचा निर्णय जाहीर केल्याने जागतिक बाजारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या घडामोडींचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठांवरही दिसून आला. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. स्थानिक बाजारात सोन्याचा दर सुमारे ३ हजार रुपयांनी वाढून १.५१ लाख रुपयांच्या आसपास पोहोचला. तर चांदीच्या दरात तब्बल १० हजार रुपयांची वाढ होत तो २.४७ लाख रुपये प्रति किलोपर्यंत गेला.तज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय तणाव कमी होण्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांचा कल पुन्हा कमॉडिटी मार्केटकडे वळत आहे. त्यामुळे आगामी काळातही सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार कायम राहू शकतात.
दरम्यान, शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारातही मोठी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्सने प्री-ओपनिंग सत्रातच तब्बल २५०० हून अधिक अंकांची झेप घेतली, तर निफ्टीमध्येही सुमारे ७५० अंकांची वाढ झाली. आयटी, मेटल आणि रिअॅल्टी क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीचा जोर दिसून आला.
याशिवाय, कच्च्या तेलाच्या दरातही घसरण नोंदवली गेली असून दर सुमारे ९५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आले आहेत. यामुळे पुढील काळात महागाईवरही सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.एकूणच, शस्त्रसंधीमुळे जागतिक बाजारात स्थैर्याचे संकेत मिळत असून गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढताना दिसत आहे.