अमेरिका : अमेरिका आणि इराण मधील तणाव कमी करण्यासाठी जाहीर झालेल्या युद्धविरामामागे नेमकी कोणाची भूमिका महत्त्वाची होती, यावर चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा करताना पाकिस्तानने मध्यस्थी केली असल्याचे नमूद केले, मात्र या प्रक्रियेत चीन चा प्रभाव अधिक असल्याचे संकेत दिले.
ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिका इराण मध्ये सैन्य कारवाईच्या तयारीत होती, परंतु सध्याच्या परिस्थितीत त्याची गरज भासणार नाही. त्यांनी दोन आठवड्यांसाठी हल्ले थांबवण्यावर सहमती दर्शवली असून,इराण च्या १० सूत्रीय शांतता प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानंतर ईराणनेही अमेरिकेच्या प्रस्तावावर चर्चा करण्याची तयारी दाखवली.
दरम्यान, बीजिंगने पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समोर येत आहे. ट्रम्प यांनीही “चीनने ईराणला चर्चेसाठी तयार केले असावे” असे संकेत दिले. मार्च अखेरीस पाकिस्तान ने मध्यस्थीची भूमिका घेतल्यानंतर चीननेही शांततेसाठी पुढाकार घेतला होता.
३१ मार्च रोजी इस्लामाबादमध्ये सौदी अरेबिया, तुर्की, इजिप्त आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली होती. त्यानंतर पाकिस्तान आणि चीनने संयुक्तपणे पाच सूत्रीय प्रस्ताव मांडत तातडीने युद्धविराम आणि होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्याचे आवाहन केले.
माध्यमांच्या अहवालानुसार, अंतिम टप्प्यात चीनने ईराणवर तणाव कमी करण्यासाठी दबाव टाकला. चर्चेदरम्यान चिनी अधिकारी सतत ईराणी अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. तसेच, युद्धविरामाच्या आधी चीन आणि रशिया ने संयुक्त राष्ट्रांमध्ये संबंधित प्रस्तावावर व्हेटो दिल्याचीही नोंद आहे.
युद्धविरामानंतर चीनकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नसली, तरी शांततेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी ट्रम्प पुढील महिन्यात बीजिंगमध्ये भेट घेणार असून, ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, ईराणने या संघर्षात आपला विजय झाल्याचा दावा करत भविष्यातील कोणत्याही कारवाईला ठोस प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. तसेच, होर्मुज सामुद्रधुनी खुली ठेवण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली असून, १० एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये या विषयावर पुढील चर्चा होणार आहे.