बारामती : राज्यात चर्चेत असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने अखेर माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने दिलेला उमेदवार आकाश मोरे यांनी आपली उमेदवारी अधिकृतपणे मागे घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशीच हा निर्णय जाहीर करण्यात आला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भाजपविरोधी भूमिका म्हणून सुरुवातीला बारामतीत उमेदवार दिला होता. मात्र, स्थानिक पातळीवरून आणि काही प्रमुख नेत्यांकडून निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती करण्यात आली.
त्यांच्या मते, रोहित पवार यांनी सकाळी भेट घेऊन सहकार्याची भूमिका घ्यावी अशी विनंती केली होती. तसेच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही याबाबत सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली. या सर्व बाबींचा विचार करून “राजकीय संस्कृती आणि संवेदनशीलता” लक्षात घेत काँग्रेसने माघार घेतल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फोनद्वारे संपर्क साधून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केल्याचे सपकाळ यांनी सांगितले. मात्र, अंतिम निर्णय हा पक्षाचा स्वतंत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “संस्कृती” हा शब्द फडणवीसांनी वापरल्याचेही त्यांनी नमूद केले.
या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मैदानात असून, काँग्रेसच्या माघारीमुळे त्यांचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.उल्लेखनीय म्हणजे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.