बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसने माघार घेतली असली, तरीही निवडणूक एकतर्फी होणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 30 उमेदवारांनी माघार घेतली. यात काँग्रेसचे संभाव्य ताकदीचे उमेदवार आकाश मोरे यांचाही समावेश होता. मात्र, त्यानंतरही 23 उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.
काँग्रेसच्या माघारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांच्यासाठी मार्ग सुकर झाल्याची चर्चा आहे. आकाश मोरे धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांच्या उमेदवारीमुळे मतांमध्ये विभागणी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे त्यांच्या माघारीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, उर्वरित उमेदवारांमध्ये बहुतांश अपक्षांचा समावेश आहे. यापैकी काही उमेदवार बारामतीबाहेरील विविध भागांतून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मुख्य लढत सुनेत्रा पवार यांच्या भोवती केंद्रित राहणार असली, तरी अपक्ष उमेदवारांमुळे मतांची विभागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या निवडणुकीत अपक्ष म्हणून डॉ. अभिजीत बिचुकले आणि करुणा मुंडे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, हे दोघेही स्थानिक नसल्याने त्यांचा प्रभाव कितपत राहील, याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता आहे.बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान 23 एप्रिल रोजी होणार असून मतमोजणी 4 मे रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.