मुंबई : राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, मुंबईत 'आशा भोसले संगीत अकॅडमी' स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यामध्ये, आशाताईंच्या नावाने संगीत अकॅडमीसह पदभरती प्रक्रियेत सुधारणा, मुंबईत आयईएस स्किल टेक विद्यापीठाच्या स्थापनेसह आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्यावतीने मुंबईत 'आशा भोसले संगीत अकॅडमी' स्थापन करणार आहे. राज्य सरकारकडे वांद्रे-अंधेरी दरम्यान हक्काची जागा उपलब्ध करून देण्याची आशा भोसले यांनी मागणी केली होती. आता, आशा भोसले यांच्या नावाने स्मारक करायच का? असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलताना आशाताईंनी दिलेला प्रस्तावच आपण पुढे नेऊ असे सांगितलं. त्यामुळे, आता वांद्रे-अंधेरी दरम्यान आशाताईंच्या नावाने संगीत अकॅडमी' उभारण्यात येणार असल्याचे निश्चित झालं आहे. यासंदर्भात जागा शोधण्यासाठी म्हाडाला आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे, मृत्यूनंतर राज्य सरकारने आशाताईंची मागणी मंजूर केल्याचं दिसून येतं.
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत विविध क्षेत्रांशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत दिवंगत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना अनोखी आदरांजली अर्पण करत त्यांच्या नावाने मुंबईत संगीत अकॅडमी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वांद्रे-अंधेरी परिसरात ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’ उभारण्याचा प्रस्ताव पुढे नेण्यात येणार असून, यासाठी योग्य जागा शोधण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. आशाताईंनी यापूर्वी केलेल्या मागणीची दखल घेत राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.याशिवाय बैठकीत प्रशासन, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.
मंत्रिमंडळातील प्रमुख निर्णय :
भरती प्रक्रियेत सुधारणा : राज्यातील शासकीय पदभरती अधिक सुलभ करण्यासाठी नवीन धोरण. एमपीएससीमार्फत सेवांची संख्या ५३ वरून १५३ पर्यंत वाढविणार.
महाजॉब्स पोर्टल : यूपीएससीच्या धर्तीवर ‘निपुण सेतू’ उपक्रमाद्वारे रोजगार प्रक्रियेला गती.
बदलापूरमध्ये वीज प्रकल्प : कुळगाव-बदलापूर येथील आराखड्यात बदल करून टाटा पॉवरला ४ एकर जागा देण्यास मंजुरी.
नवीन कौशल्य विद्यापीठ : मुंबईत ‘आयईएस स्किल टेक विद्यापीठ’ स्थापन करण्यास हिरवा कंदील.
मच्छिमारांसाठी निधी : सागरी जिल्ह्यांमध्ये सुविधा उभारण्यासाठी ६१.२४ कोटी रुपयांची तरतूद.
आरोग्य व्यवस्थेचा विकास : जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून सुमारे ३,७०८ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य.
आकांक्षित जिल्हा कार्यक्रम विस्तार : आणखी ६ जिल्ह्यांचा समावेश; एकूण १७७ तालुक्यांमध्ये विकास योजना.
वैद्यकीय परिषदेतील बदल : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियमात सुधारणा; सदस्य नियुक्तीची पद्धत बदलणार.
या सर्व निर्णयांमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळण्यास मदत होणार असून, विशेषतः आशा भोसले यांच्या नावाने उभारली जाणारी संगीत अकॅडमी ही सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वाची पाऊल ठरणार आहे.