नाशिक : नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत उघडकीस आलेल्या लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) एका माजी कर्मचाऱ्याकडून महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याने तपासाचा वेग वाढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित संशयित कर्मचारी केवळ नोकरीपुरते मर्यादित न राहता कामाच्या वेळेनंतरही कंपनीत थांबून संशयास्पद हालचाली करत होते. काही महिला कर्मचाऱ्यांवर मानसिक दबाव टाकून त्यांना विशिष्ट विचारांकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
2022 पासूनच सुरू होता कट्टरतेचा प्रयत्न?
एसआयटी च्या प्राथमिक तपासात असे संकेत मिळत आहेत की, मुख्य आरोपींनी 2022 पासूनच कंपनीच्या वातावरणाचा गैरवापर करत कट्टर विचारसरणी रुजवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. कंपनीच्या साधनसंपत्तीचा वापर करून काही महिलांना लक्ष्य करण्यात येत असल्याची शक्यता तपासात व्यक्त केली जात आहे.
फंडिंग आणि डिजिटल पुराव्यांची चौकशी
या प्रकरणात परदेशातून आर्थिक मदत मिळत होती का, याचाही तपास सुरू आहे. संशयितांच्या बँक व्यवहारांची तपासणी केली जात असून ई-मेल, चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि संभाव्य धमक्यांचेही विश्लेषण करण्यात येत आहे.
आरोपी अश्विनी चैनानीची कोठडी वाढवली
या प्रकरणातील महत्त्वाची संशयित आणि कंपनीतील वरिष्ठ अधिकारी अश्विनी चैनानी हिची पोलीस कोठडी 15 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. तपासादरम्यान कंपनीच्या सर्व्हरवरून पाठवण्यात आलेले 78 ई-मेल्स तपासाच्या कक्षेत आले आहेत. तसेच चैनानी आणि इतर संशयितांमधील वारंवार संपर्कही उघड झाला आहे.सरकारी पक्षाच्या मते, पीडितेने तक्रार दिल्यानंतरही तिला मदत न करता तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
पॉश समितीवर प्रश्नचिन्ह
लैंगिक छळ प्रतिबंधक पॉश समितीची सदस्य असतानाही चैनानी यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष का केले, यावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. 2023 पासून सुरू असलेल्या कथित अत्याचारांबाबत योग्य कारवाई न झाल्याने समितीच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे.दरम्यान, एसआयटी कडून सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असून आगामी काळात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.